मंत्रिपदावर काट, धनंजय मुंडे यांच्याकडे नवी जबाबदारी?
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत
मुंबई : विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची चिन्हं (Dhananjay Munde New Responsibility) आहेत.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची नव्हे, तर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु त्यांना राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील चुरशीच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील शाब्दिक युद्ध प्रचारापासून चर्चेत होतं. अखेर निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजांचा पराभव करत विधानसभा गाठली. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार की संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.
“धनंजय, आपण मंत्री होऊन भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या” असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंडय मुंडे यांना दिलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांची स्वप्नपूर्ती होणार का, याकडे नजर आहे.
याआधी, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंडेंच्या औरंगाबादमधील स्मारकाचं काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनंजय मुंडेंनी केली होती.
धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. धनंजय मुंडे यांनी काका आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला, तो अजित पवारांच्या पुढाकारानेच.
अजित पवारांनी बंड पुकारत देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे त्या दिवशी संपर्कात नव्हते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावली आणि आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात होतं.
Dhananjay Munde New Responsibility