धनंजय मुंडेंनी आरोप केलेले पंकजा मुंडेंचे नवे भाऊ कोण ?
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Viral Video about Pankaja Munde) यांनी आज (20 ऑक्टोबर) बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच भाजपमध्ये आता नव्याने आलेले नवे भाऊच या बहिण भावाच्या नात्यात विष कालवत असल्याचा आरोप केला आहे.
बीड: राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Viral Video about Pankaja Munde) यांनी आज (20 ऑक्टोबर) बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच भाजपमध्ये आता नव्याने आलेले पंकजा मुंडे यांचे नवे भाऊच या बहीण-भावाच्या नात्यात विष कालवत असल्याचा (Dhananjay Munde on Viral Video about Pankaja Munde) आरोप केला आहे. त्यामुळे हे नवे भाऊ नेमके कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पंकजा मुंडे यांना बहीण माणणारे राजकारणात अनेक मोठे चेहरे आहेत. यात सुरेश धस, उदयनराजे भोसले, महादेव जानकर, राम शिंदे या मोठ्या नावांचा समावेश आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, “मी असं काय केलं ज्यामुळे असं शेवटचं अस्त्र वापरलं. ज्यांनी हे केलं त्याच्यापर्यंत मी पोहचेन. आता नव्याने भाजपमध्ये आलेले नवे भाऊ या बहीण-भावाच्या नात्यात विष कालवत असतील तर हे दुर्दैवी आहे. काही दिवसातच ही व्हिडीओ कुणी एडीट केली हे लोकांसमोर येईल. काल माझ्याविरोधातील आरोपांची शहानिषा न करता गुन्हा दाखल करण्यात आला.”
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतचे सर्व आरोप फेटाळले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, “ज्या बहिणीसाठी 2009 मध्ये हा परळीचा मतदारसंघ सोडला, त्यांच्याकडूनच जर अशी बदनामी होत असेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी हे होत असेल, तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको.” जर निवडूनच यायचं होतं तर एका शब्दाने जरी म्हटलं असतं तर निवडणूक लढलो नसतो. मात्र, असं करण्याची आवश्यकता नव्हती, असं म्हणत त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.
धनजंय मुंडे म्हणाले, “मी 17 ऑक्टोबरला सभेत जे बोललो त्यात एडीट करुन काही लोक आम्हा बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत. मागील 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मात्र कधीही असं बोललो नाही. या घटनेने मन पिळवटून निघालं. मी माझ्या सख्या बहिणींकडून आधी राखी बांधली नाही, पण पंकजा आणि प्रितमकडून बांधली. याआधीही दोन भावांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम मी आजही भोगतो आहे. आमचं रक्ताचं नातं आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात कोण विष कालवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या खोलात जाणार. मी अनेक निवडणुका जिंकलो आणि हरलो. मात्र, कधीही कुणाविषयी असं व्यक्तिगत बोललो नाही.”
ज्याला विष कालवायचं होतं त्यांनी विष कालवून माझी बदनामी केली. अशा काही गोष्टी निवडणुकीच्या शेवटच्या काळात होतील, याचा अंदाज होता. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर होईल, असं वाटलं नाही. निवडणूक विचाराने लढवावी आणि जिंकावी. मात्र, असं घडल्यानं, या नात्यावर डाग लागल्याने हे जग सोडून जावं, असं वाटत होतं. हा अभद्र आरोप निवडणूक जिंकण्यासाठी होत असेल तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको, असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपला उद्वेग व्यक्त केला.
2009 मध्ये याच बहिणीसाठी या मतदारसंघाचा त्याग केला आणि याच बहिणीला निवडून आणलं. तेच लोक जर बदनाम करत असतील, तर जगावं की मरावं असा माझ्यासमोर प्रश्न आहे, असंही धनंजय मुंडेनी नमूद केलं.