105 आमदार येऊनही विरोधात, फडणवीसांच्या काळात गुप्त विकास : धनंजय मुंडे
महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद प्रचारसभेत भाजपवर निशाणा साधला.
नाशिक : “विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अशा 105 जागांवर भाजप निवडून आली तरी विरोधी पक्षात बसली. हा नियतीचा खेळ आहे”, असं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde slams Devendra Fadnavis) म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची नाशिक येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेला विकास हा गुप्त विकास होता. तो कुणालाच दिसला नाही. हा विकास फक्त भाजप कार्यकर्त्यांच्या पवित्र डोळ्यांना दिसला”, अशी टीका धनंजय मुंडे (Dhananjay Munde slams Devendra Fadnavis) यांनी केली.
“विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या वळणावर गेलं. संबंध देशाला खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाही काय असते हे दाखवून दिलं. 56 आमदार निवडून आलेल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले. 54 आमदार निवडून आलेल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले. 44 आमदारांचे मंत्री झाले आणि 105 आमदारांनी निवडून आलेली भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात बसली”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“जे पुन्हा येईन म्हणाले ते पुन्हा येणार नाहीत याचा बंदोबस्त या लोकशाहीने आणि पवार साहेबांनी दाखवून दिला. 105 आमदार येऊन जर विरोधी पक्षात बसावं लागत असेल तर कुठेतरी नियतीचा खेळ आहे. हा खेळ वरचा आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“भाजपनं गेल्या पाच वर्षात मग्रूरीनं सत्ता चालवली. ही मग्रूरी अशी कुणी भाजपला विरोध करतोय त्याला ईडीची, एसीबीची किंवा आयकर विभागाची नोटीस यायची. पण या निवडणुकीच्या नंतर भाजपची मग्रूरी जनतेच्या आशीर्वादानं आम्ही मोडून काढली आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आलं”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“विकास आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीला भाजपचे नेते फसविले म्हणतात. आम्ही दोन लाखांची कर्जमाफी केली. काळजी करु नका, महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांच्यावर कर्ज झालेल्यांनाही दोन लाखांची कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा फायदा होईल यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे”, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.