टायगर अभी जिंदा है… धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स,चर्चाच चर्चा!
विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आलंय. तर खास बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांची मिरवणूक निघणार आहे.
संभाजी मुंडे, परळी (बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मुंबईत उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत (Parali) येत आहेत. या निमित्त त्यांच्या समर्थकांनी मुंडे यांचं जोरदार स्वागत करण्याचं ठरवलंय. उद्या रविवारी धनंडय मुंडे यांचं परळीत आगमन होतंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीला अक्षरशः स्वागत नगरी करून टाकलंय. टायगर अभी जिंदा है… असे बॅनर्स येथे जास्त लक्ष वेधून घेत आहेत. तर मुंडे यांचं ज्या मार्गावरून आगमन होणार आहे, तेथे मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्यात. धनंजय मुंडे, अजित पवार यांचे मोठे कट आऊट्स परळीतील रस्त्यांवर दिमाखात उभे आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा परळीत कार अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आलं होतं.
35 दिवसानंतर परतणार
धनंजय मुंडे यांचा 4 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी परळीत भीषण अपघात झाला होता. या घटनेत त्यांची कार अक्षरशः चक्काचूर झाली होती. तर मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. मुंबईतील बीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी तब्बल 35 दिवसानंतर ते परळीत परतत आहेत. एवढ्या मोठ्या अपघातातून ते सुखरूप बचावले, याचा आनंद कार्यकर्ते साजरा करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सजली आहे. त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात पन्नास फुटी बॅनर लावण्यात आलेत. टायगर अभी जिंदा है या अशा आशाचे बरेच बॅनर येथे पाहायला मिळतायत. तर परळी शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराला कमानीने सजवण्यात आले.
उद्या गहिनीनाथाचं दर्शन
आमदार धनंजय मुंडे उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्यात येतील. आधी गहिनीनाथ गडावर जावून दर्शन घेतील. त्यानंतर ते मूळ गावी परळीत येतील. दुपारी 4 वाजता ते परळीत येतील. येथे वैद्यनाथाचं दर्शन घेतील. नंतर पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतील.
केरळ-तिरूपतीचं बँड पथक, BMW तून मिरवणूक
आमदार धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत भव्य मिरवणूक निघणार आहेत. विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आलंय. तर खास बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांची मिरवणूक निघणार आहे. परळीच्या रस्त्या-रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.