छत्रपती संभाजीराजेंनी रणशिंग फुंकलं, 2024 मध्ये स्वराज्य संघटना निवडणूक लढणार, कुणासोबत जाणार?
12 मे 2022 रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांनी सर्वप्रथम निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला होता.
संतोष जाधव, धाराशिव : छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी अखेर निवडणुकीच्या (Election) आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज उस्मानाबाद अर्थात धाराशिव येथे याबद्दल मोठं वक्तव्य केलं. संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या 58 शाखांचं उद्घाटन आज धाराशिव येथे करण्यात आलं. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघटनेच्या शाखेचं उद्घाटन केलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्थेचे कसे हाल झाले आहेत, यावरून संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली. भूम येथील रुग्णालय महाराष्ट्रात नंबर वन हवं होतं, मात्र तशी स्थिती नाहीये, अशी खंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.
आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवर निशाणा
धाराशिव येथे फिरताना मतदारसंघातील नागरिक अनेक समस्यांचा सामना करत असल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘ धाराशिवमध्ये लोकांनी मला समस्या बोलून दाखवली. लाईट मिळत नाहीत. बाकीच्या राज्यात 24 तास लाइट आहेत. महाराष्ट्र प्रगत असताना रुग्णलयाचे प्रश्न आहेत. दोन रुग्णवाहिकेला एकच ड्रायव्हर. शिफ्ट पाहिली असता दोन रुग्णवाहिकांना चार ड्रायव्हर हवे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातलं रुग्णालय तर महाराष्ट्रात नंबर 1 असायला पाहिजे. बाकी जिल्ह्यांनी इथला आदर्श घेतला पाहिजे. पण तशी स्थिती नाही.
निवडणुकीत स्वतंत्र उतरणार
छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी दिले. ते म्हणाले, आधी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. मात्र समविचारी दोन लोक आले तर स्वागत आहे. खऱ्या अर्थाने फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे विचार घेऊन चालतात, त्यांच्यासाठी आम्ही ओपन आहोत. जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुसंस्कृत करू शकतात. रयतेचे प्रश्न सुटायला पाहिजेत, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली. 12 मे 2022 रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांनी सर्वप्रथम निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला होता.
नव्या सरकारलाही लोक कंटाळले
मविआ सरकारने आधीच अस्थिर सरकार दिले. त्यानंतर नवीन आलेलं सरकारही अस्थिर असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले, ‘ लोकं कंकटाळले आहेत. परत तेच करत असाल तर लोकांना ते आवडणार नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तुमचं सरकार आलंय तर 24 तास शेतकऱ्यांना लाईट द्या. 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार होतं. ते मिळालेलं नाही. हे प्रश्न सोडवले तर आम्ही त्यांचं कौतुक करू..