धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं
व्यासपीठावर येताच धीरज देशमुख यांनी दोन्ही भावांना मिठी मारली. त्यानंतर लातूरवासियांसमोर नतमस्तक होत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मातोश्रींचे आशीर्वाद घेत धीरज यांनी त्यांची गळाभेट घेतली, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले.
लातूर : लातूरमधून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र धीरज देशमुख यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. पहिल्याच भाषणात धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh Latur Speech) यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर व्यासपीठावर उपस्थित विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख, धीरज यांचे ज्येष्ठ बंधू आणि आमदार अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबाचे डोळे पाणावले.
व्यासपीठावर येताच धीरज देशमुख यांनी दोन्ही भावांना मिठी मारली. त्यानंतर लातूरवासियांसमोर नतमस्तक होत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मातोश्रींचे आशीर्वाद घेत धीरज यांनी त्यांची गळाभेट घेतली, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले.
‘तुमचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. तुमच्याकडे काय मागू हा प्रश्न पडला आहे. एकच सांगतो, तुमच्या धीरजचा आवाज साहेबांपर्यंत पोहचवा’ असं धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh Latur Speech) म्हणताच उपस्थित हेलावले.
धाकल्याच्या प्रचारासाठी रितेश दादा लातुरात तळ ठोकून
माझ्या उमेदवारीचा खरा शिलेदार इथे उपस्थित तरुणवर्ग आहे. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही पाठीशी राहणार असाल तर आयुष्यभर तुमची सेवा करेन. कारण लातूरमधला प्रत्येक तरुण, महिला, शेतकरी आमदार होणार आहे. लातूर ग्रामीण भागाचा प्रतिनिधी म्हणून मला पक्षाने संधी दिली आहे. मी उभा असलो, तरी धुरा तुमच्या हाती आहे, असं धीरज देशमुख म्हणाले.
दिल्लीला काही सांगायचं असेल तर मुंबईला धक्का द्या असं भैया (अमित देशमुख) म्हणाले. लातूरला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. अमित भैयांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तीन हा त्यांचा लकी नंबर आहे. त्यामुळे विजयी होऊन अमित देशमुखांना मुख्यमंत्रिपदावर बसवणार, असी ग्वाही धीरज देशमुख यांनी दिली.
‘अब तो मेरी जिंदगी का मकसद यही है, इतना काबील बनू के तुम्हारे हर सपने को पुरा कर सकू’ अशा चार ओळी म्हणत धीरज देशमुख यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख, तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत. धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या अगोदर राजकारणाचे धडे गिरवले आहेत. वडील विलासराव देशमुख आणि मोठा भाऊ अमित देशमुख यांच्यामुळे धीरज देशमुखांनी राजकारण जवळून पाहिलं आहे.
धाकटा भाऊ निवडणुकीला पहिल्यांदाच उभा राहतोय म्हटल्यावर रितेश देशमुखही लातुरात पोहोचला. त्याने उमेदवारी दाखल करण्यापासून ते गावा-गावातल्या प्रचारात पुढाकार घेतला आहे. विलासरावांमुळे काँग्रेसचा गड बनलेल्या या लातूर मतदारसंघात धीरज देशमुखांचं स्वागत होतंय. कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाला आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
रितेश जातो तिथे जंगी स्वागत आणि लोकांची गर्दी, ढोल-ताशांचा धडाका आणि रितेशच्या भाषणाचा तडका असतो. धीरज देशमुख राजकारणात नवखे असले तरी त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं राजकारण त्यांना प्रचारात मदत करत आहे. लातूरमधील या दोन मतदारसंघांमध्ये देशमुख कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.