‘दत्तक नको, स्वत:चं पोर हवं, कारण आमच्या कमरेत जोर आहे’
धुळे: धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असं चित्र आहे. कारण भाजपविरोधात भाजप आमदार अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष यांच्यातच कडवी लढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल धुळ्यात सभा झाली, तर अनिल गोटे हे सुद्धा कसून प्रचार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर अनिल गोटे यांची सभा झाली. या […]
धुळे: धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असं चित्र आहे. कारण भाजपविरोधात भाजप आमदार अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष यांच्यातच कडवी लढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल धुळ्यात सभा झाली, तर अनिल गोटे हे सुद्धा कसून प्रचार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर अनिल गोटे यांची सभा झाली. या सभेत अनिल गोटेंनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली.
अनिल गोटे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात मी धुळे शहर दत्तक घेतलं, नाशिक दत्तक घेतलं, जळगाव दत्तक घेतलं, सांगली घेतलं. मात्र एवढ्या दत्तकानंतर तुमच्या मांडीवर आमच्यासाठी जागा तर आहे का? आम्हाला दत्तक नको. आम्हाला आमच्या स्वत:चं पोर असलं पाहिजे, आमच्या कमरेत जोर आहे”
यावेळी अनिल गोटे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ग्रीस महाजन असा उल्लेख केला. “ज्याप्रमाणे सुरेश जैन यांचं पार्सल आम्ही परत पाठवलं, तसे जामनेरच्या या ग्रीसचं भरीत करून पाठवू”, असा हल्लाबोल अनिल गोटे यांनी केला. याशिवाय तुमचं सरकार मी वाचवले हे विसरू नका, अशी आठवण अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली.
रावसाहेब दानवे हे दादा कोंडके : अनिल गोटे
मुख्यमंत्र्यांचं भाषण
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याचा विकास करण्याचं आश्वासन दिलं. धुळे शहर आधुनिक करायचं आहे. केंद्रात मोदीजी, महाराष्ट्रात भाजप आहे. पण धुळ्यात टक्केखोर राहिले तर धुळ्याचा विकास होऊच शकत नाही. आम्ही केवळ बोलणारे नाहीत, जळगावात भाजपची सत्ता आल्यानंतर आठव्या दिवशी शंभर कोटी दिले. सांगलीत भाजपची सत्ता आल्यानंतर आठव्या दिवशी शंभर कोटी दिले. धुळ्यात आचारसंहिता असल्यामुळे मी कोणती घोषणा करणार नाही. पण तुम्हाला सांगू इच्छितो धुळ्यात सांगली किंवा जळगावपेक्षा जास्त विकासाची गरज आहे. तो विकास भाजप करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
धुक्यात गुंडाराज चालणार नाही. इथे कायद्याचंच राज्य चालेल, अन्यथा कायद्यानं ठोकून काढू, असा इशारा त्यांनी दिला.
धुळे महापालिका निवडणूक
येत्या 9 डिसेंबरला धुळे महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपला धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर भाजप आमदार अनिल गोटे नाराज झाले असून त्यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तिकीट वाटप केली.
त्यातच धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. या निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली. भाजपत डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात गट पडले.
आमदार अनिल गोटे यांनी स्वच्छ आणि कोरी पाटी असणाऱ्या तरुण उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे हे राष्ट्रवादीसह अन्य पक्षातल्या आणि महत्वाची पदे घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या लोकांना भाजपात प्रवेश देत असल्याचा आरोप आहे. त्यातल्या अनेक लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. आमदार अनिल गोटे हे भाजपात तरुण उमेदवारांना संधी देऊ इच्छित असताना दुसरीकडे भामरे हे आयारामांना संधी देत असल्याचा आरोप आहे. आमदार अनिल गोटे यांनी याबाबत वेळोवेळी पत्रक काढून भामरे यांच्यावर टीका देखील केली आहे.
अनिल गोटे यांनी शहरात सभा घेऊन महापालिकेच्या महापौरपदाचा उमेदवार स्वत:च असल्याचं जाहीर केले होते. शिवाय त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामाही देऊ केला होता, पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही. त्यानंतर अनिल गोटे यांच्या पत्नीला महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधीलच एक गट म्हणजेच स्वाभिमानी भाजप आणि स्वतःचा पक्ष लोकसंग्रामच्या माध्यमातून अनिल गोटे 74 उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. या गटाकडून (स्वाभिमानी भाजप+लोकसंग्राम) अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या महापौरपदाच्या उमेदवार असतील. या सर्व पार्श्वभूमीवर धुळ्यात कोण बाजी मारणार हे 10 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
रावसाहेब दानवे हे दादा कोंडके : अनिल गोटे
शिवसेना आणि अनिल गोटे मिळून धुळ्यात भाजपला रोखणार?
मला ठार मारण्याचा अमोल चौधरींचा कट : अनिल गोटे