धुळ्यात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु, अनिल गोटेंच्या नेतृत्वात बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

| Updated on: Oct 29, 2020 | 4:46 PM

माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने धुळे जिल्ह्यातील प्रभाकर बुधा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

धुळ्यात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु, अनिल गोटेंच्या नेतृत्वात बड्या नेत्याचा पक्षप्रवेश
Follow us on

धुळे : राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वात धुळ्यातील बड्या नेत्याने राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर बुधा पाटील यांनी पक्षप्रवेश केला. (Dhule Leader Prabhakar Patil joins NCP in presence of Anil Gote)

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने धुळे जिल्ह्यातील प्रभाकर बुधा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष बळकटीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, प्रदेश चिटणीस सुरेश सोनावणे तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनिल गोटे यांनी भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचे आवाहन केले होते. त्यानंतर काही तासातच त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाजपच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले. खडसे यांच्याआधीच अनिल गोटे यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Dhule Leader Prabhakar Patil joins NCP in presence of Anil Gote)

सत्तांतरासाठी गोटे-खडसे प्रयत्न करणार

सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सध्या माझ्या संपर्कात भाजपचे 16 नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. आदेश आला की 24 तासात चमत्कार दिसेल, असे गोटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं.

धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

परत फिरा रे! खडसेंच्या प्रवेशानंतर अनिल गोटे आशावादी, भाजपवासी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत परतण्याचे आवताण

अनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

(Dhule Leader Prabhakar Patil joins NCP in presence of Anil Gote)