वय वर्ष फक्त 32, मध्य प्रदेशात दिग्विजय सिंहांच्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद
भोपाळ : मध्य प्रदेशात युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली असली तरी काँग्रेसने मंत्रीमंडळात युवा नेत्यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी युवा ब्रिगेडच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलालाही मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 28 मंत्र्यांपैकी एक तृतीयांश चेहरे असे आहेत, ज्यांचं वय […]
भोपाळ : मध्य प्रदेशात युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली असली तरी काँग्रेसने मंत्रीमंडळात युवा नेत्यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी युवा ब्रिगेडच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मुलालाही मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 28 मंत्र्यांपैकी एक तृतीयांश चेहरे असे आहेत, ज्यांचं वय 40 ते 50 दरम्यान आहे. तब्बल 15 वर्षानंतर एका मुस्लीम मंत्र्यालाही संधी देण्यात आली आहे.
दिग्विजय सिंह यांचे चिरंजीव जयवर्धन सिंह हे मध्य प्रदेशच्या विद्यमान मंत्रीमंडळातील सर्वात युवा मंत्री ठरले आहेत. दिग्विजय सिंह यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. जातीय समीकरणं आणि अंतर्गत नाराजी जपत मंत्रीपदांचं वाटप करण्यात आलं आहे.
28 मंत्र्यांची निवड करताना कमलनाथ यांची कसोटी लागली होती. यासाठी दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. सर्वांनीच आपापल्या समर्थक आमदारांना मंत्री करण्यासाठी शिफारस केली. अखेर या मंत्रीमंडळात युवा नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
32 वर्षीय जयवर्धन कमलनाथ कॅबिनेटमधील सर्वात युवा मंत्री आहेत. तर शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळाच्या तुलनेत कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळात महिला मंत्र्यांची कमतरता आहे. शिवराज सिंह यांच्या मंत्रीमंडळात पाच महिला मंत्री होत्या, तर कमलनाथ यांनी केवळ दोन महिलांना मंत्रीपद दिलं आहे.
मध्य प्रदेशात 15 वर्षानंतर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. 11 डिसेंबर रोजी लागलेल्या निकालात भाजप आणि काँग्रेस यांच्यात कडवी झुंज झाली. दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे काँग्रेसचा मार्ग सोपा झाला. सपा आणि बसपाच्या पाठिंब्याने काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला.