पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांनी काहीही म्हटलं तरी उदयोगपती स्वत:चा निर्णय स्वत:चा घेतात. आपला उद्योग कुठे चालेल यावर तो उद्योग कुठे सुरु करायचा याचा निर्णय घेतात”, असं दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) म्हणाले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते, खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय. मुळात राज्यामधील अपयश पचवण्यासाठी भाजप नेते वेगवेगळ्या क्लुप्त्या काढत आहेत. अमोल कोल्हे नाराज नाहीत. त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल, असं वळसे पाटील म्हणालेत.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्याबाबत प्रत्येक तालुका कार्यकर्त्यांशी बैठक आज बैठक होणार आहे. ही नियमित बैठक आहे. कार्यकर्त्याची राजकीय भूमिकेबाबत चर्चा होत असते. त्याबाबत बैठक होणार आहे, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिलीय.
भाजपला जिल्हा परिषद हवी आहे आणि लोकसभाही हवीय. पण आम्ही दोन्ही जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
भाजप फक्त वादग्रस्त मुद्दे उभे करतं. केंद्र आणि राज्य यांचे अपयश लपवण्यासाठी असे प्रकार सुरू आहेत. सत्ता केंद्र दोन होतील. पण अधिकारी कुणाचा आदेश मानायचा यावर संभ्रम निर्माण होईल. हे सरकार बेछूट कामं करतंय. अतिरिक्त सीपी देण्यात आले आहेत. ही नवी सिस्टीम काम कशी करते पाहावं लागेल, असं वळसे पाटील म्हणालेत.
वीज विभाजन माझ्या काळात झालं. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की, खाजगीकरण होणार नाही. पण अदानी आणि सरकार याचं काय सुरू आहे, माहिती नाही. काय सरकार चर्चा करतंय?, असं वळसे पाटील म्हणालेत.