देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बवर सरकारकडून सावध प्रतिक्रिया, व्हिडीओची सत्यता पडताळून बोलणार – गृहमंत्री
विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जातेय. तसंच फडणवीसांनी दिलेले सर्व व्हिडीओ तपासूनच त्यावर उद्या सविस्तर बोलेन असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Pravin Chavan) यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जातेय. तसंच फडणवीसांनी दिलेले सर्व व्हिडीओ तपासूनच त्यावर उद्या सविस्तर बोलेन असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय.
व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल- वळसे पाटील
देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप करत एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासाचं फुटेज असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. फडणवीसांच्या या आरोपांबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन. व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
सरकारची काम करण्याची पद्धत चुकीची नाही – देसाई
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही सावध प्रतिक्रिया देत फडणवीसांनी नेमके काय आरोप केले हे तपासले पाहिजे. सरकारची काम करण्याची पद्धत चुकीची नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत अधिक घोषणा करतील, असं देसाई म्हणाले.
पेगासस देखील एवढं करणार नाही – भुजबळ
छगन भुजबळ यांनीही फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पवार साहेब कुणाबाबत असं भाष्य करणं शक्य नाही. 130 तासांचे व्हिडीओ काढले आहेत तर हे सर्व तपासलं जाईल. सत्य बाहेर येईलच. त्या पुराव्यांवर मला अजिबात विश्वास नाही. पेगासस देखील एवढं करणार नाही. एक तास ठीक आहे पण एवढे तास! ते जे सांगत आहेत ते खरं आहे हे कशावरुन? सरकार तपास करेल. व्हिडीओ काढले आणि नंतर त्यात दुसरंच काही भाषण टाकलं तर? असा सवाल भुजबळ यांनी विचारलाय.
यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची – पटोले
नाना पटोले यांनीही फडणवीसांच्या आरोपांबाबत खोचक टीका केलीय. जे काही व्हिडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे. त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपिग केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणविस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
इतर बातम्या :