सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे चिल्लर, राऊतांना पापाची शिक्षा, रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार; दिपाली सय्यद यांचा हल्लाबोल
येत्या शनिवारी दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यावर शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्याबाबतचे संकेत देतानाच मला कोणतं पद मिळणार हे माहीत आहे.
मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. स्वत: दिपाली सय्यद यांनीच या प्रवेशाची माहिती दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एवढेच नव्हे तर दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करतानाच रश्मी ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊतच शिवसेनेच्या फुटीला जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. राऊतांबद्दल एवढेच बोलले, त्यांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापांची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं राऊत उत्तम उदाहरण आहेत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
राऊतांमुळे पक्ष फुटला. शिवसेनेचे दोन वेगळे गट झाले. एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत उभी आहे. ते माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
आम्ही पक्षात काम करत होतो. पक्षाबरोबर आपणही आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. प्रत्येकालाच तसं वाटतं. पण आमचा पक्ष फुटला. पण पक्ष ज्या कारणांमुळे फुटला ते माहीत झालं.
तेव्हा मी या सर्वांना एकत्र आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण कुठे तरी बिनसतंय असं वाटलं. समोरून एक पाऊल पुढे टाकलं गेलं नाही. त्यामुळे पक्ष एकसंघ होऊ शकला नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.
दरम्यान, येत्या शनिवारी दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यावर शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्याबाबतचे संकेत देतानाच मला कोणतं पद मिळणार हे माहीत आहे. हे पद मिळाल्यास मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असं त्या म्हणाल्या.