शिवाजी पार्क सील केलं तर… दसरा मेळाव्यावरुन चंद्रकांत खैरे यांची डायरेक्ट धमकी
शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात थेट आमना सामना रंगला आहे. त्यातच आता शिवसेना आणखीनच आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू अशी डायरेक्ट धमकीच युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळींनी दिली होती. यानंतर आता शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे( Chandrakant Khaire ) यांनी देखील आक्रमक भाषा केली आहे.
परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. ही परंपरा खंडित होणार नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या वाहनात बसूनच भाषण केले होते. उद्धव ठाकरे सुद्धाअशाच प्रकारे भाषण करतील. कायदा सुव्यवस्था बिघडली तर ईडी सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते शरद कोळी
सत्तेचा दुरुपयोग करुन शिंदे गटाने शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण शिवतीर्थ मैदान कुदळ फावड्याने उखडून काढू असा गर्भित इशारा शरद कोळी यांनी दिला होता.
शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी चढाओढ
शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे शिंदे गटाला दसरा मेळावा दुसरीकडे घ्यावयाचा झाल्यास बीकेसे मैदान हे पर्यायी जागा त्यांना उपलब्ध झाली आहे.