मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाले. त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रमदेखील अचानकपणे रद्द करण्यात आले. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या मताविरोधातील भूमिका समोर आलेली. उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावर शरद पवारांनी जेपीएस चौकशीची गरज नसल्याच म्हटलं. त्यानंतर महाविकास आघाडीत जणू ठिणगीच पडली. दरम्यान नॉट रिचेबल झालेले अजित पवार अचानक एका खासगी कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि पित्ताच्या त्रासामुळे कालचे कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ही घडामोड ताजी असतानाच महाविकास आघाडीमध्ये मतभेदांची एक मालिकाच सुरु झाली.
महाविकास आघाडीतील मतभेद समोर येताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु झाले आहेत. मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीपेक्षा कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेस चौकशीवर ठाम आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.
‘ईव्हीएमवर विरोधी पक्षांचा विश्वास नाही’, संजय राऊतांची भूमिका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन प्रश्न उपस्थि केले आहेत. “आमची शरद पवार यांच्याकडे मागणी आहे. विरोधी पक्षांची 15 दिवसांपूर्वीच दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीत ईव्हीएमवर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला. ईव्हीएच्या माध्यमातून निवडणुकीत कसे घोटाळे होतात त्यावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं आणि मोदींच्या लोकप्रियतेचं जे रहस्य आहे ते त्या ईव्हीएममध्ये आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. विदेशात विरोधी पक्षाने आक्षेप घेतला की, आमचा विश्वास नाही. तिकडच्या राष्ट्रप्रमुखांनी निर्णय ताबडतोब रद्द केला. हे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे की, लोकशाही काय आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
‘ईव्हीएमला दोष देण्यात काहीच अर्थ नाही’, अजित पवारांची भूमिका
दुसरीकडे अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडली. “ईव्हीएमला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस पराभव झाला की आपण ईव्हीएमला दोष द्यायचा आणि विजय झाला की सगळं आलबेल आहे, असं म्हणायचं हे बरोबर नाही”, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
संजय राऊत यांचा अजित पवारांना टोला
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला. “अजित पवार हे आमच्या महाविकास आघाडीचे सहकारी आहेत. त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे तो त्यांचा मुद्दा आहे. पण देशाच्या जनतेचा ईव्हीएम विश्वास नाहीय. जे भाजपचे भक्त आणि अंधभक्त आहेत त्यांचा ईव्हीएमवर भरोसा आहे. अजित पवारांची गनना आणि तुलना अंधभक्तांशी होऊ नये”, असा टोला राऊतांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही मोदींच्या आणि भाजपच्या बाजूची आहे. तर राऊतांची भूमिका भाजपच्या विरोधात आहे.
‘मोदींनी 2014 मध्ये करिश्मा दाखवला, त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं नाही’, अजित पवारांची स्पष्ट भूमिका
“जनतेने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिलंय का? त्यांनी 2014 साली देशात स्वत:चा करिश्मा निर्माण केला. तो करिश्मा भाजपचा त्याआधी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्यामुळे त्याचं श्रेय नरेंद्र मोदी यांनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय? आतापर्यंत जे कुणी देशाचे पंतप्रधान झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना आपल्या लोकशाहीत बहुमताचा आदर करुन मतं मिळाली आहेत. बहुमताला महत्त्व आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.
‘देशासमोर डिग्रीचा प्रश्न आहे का?’, शरद पवारांची भूमिका
दुसरीकडे शरद पवार यांनीही महाविकास आघाडीच्या मताविरोधात भूमका मांडली आहे. “आज देशासमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? यांती डिग्री काय? डिग्री हा काय राजकीय प्रश्न नाही. लोकांसमोर, बेकारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
‘…नाहीतर आपले शैक्षणिक विद्यापीठं बोगस डिग्रीच्या फ्रॅक्ट्री बनतील’, राऊतांची भूमिका
या प्रकरणात संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात मत मांडलं आहे. “संविधानिक पदावर असलेले पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल यांची डिग्री आहे की नाही ते महत्त्वाचं नाही. पण ती जर असेल तर ती बरोबर असली पाहिजे. नाहीतर आपले शैक्षणिक विद्यापीठं बोगस डिग्रीच्या फ्रॅक्ट्री बनतील. पंतप्रधान आहेत, त्यांच्या डिग्रीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत खुलासा व्हायला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी गौतमी अदानी यांच्या जेपीएस चौकशीच्या मुद्द्यावर मोठं विधान केलंय. “मुद्दा असाय की हिंडेनबर्ग कोण मला हे माहिती नाही. एक परदेशातील कंपनी ती या देशातल्या परिस्थिती संदर्भात काही भूमिका घेते, त्याकडे किती लक्ष द्यावं, याचा विचार केला पाहिजे. जेपीसी चौकशीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती ही अधिक प्रभावी ठरेल”, असं मत शरद पवारांनी मांडलंय. तर संजय राऊतांनी त्या विरोधात भूमिका मांडलीय. त्यांनी थेट शरद पवारांकडे एक मागणी केलीय.
“या देशातील अनेक प्रमुख उद्योगपती आणि राजकारण्यांना टारगेट केलं जातंय. पण गौतम अदानीला मोकळं सोडलं जातंय. लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे. जो न्याय गौतम अदानींना दिला जातो तो इतर उद्योगपतींना द्या. शरद पवारांनी यावर भूमिका घ्यावी, अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर सत्ताधारी संधी कशी सोडतील? त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर टीका करण्यात आलीय. महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर असल्याचा दावा शिवेसेनेचे नेते किरण पावसरकर यांनी केला आहे. “संजय राऊत जे बरळत आहे त्यावर उद्धव ठाकरे यांचं मत काय ते विचारलं पाहिजे. जेपीसी असायला हवी की नको हवे, सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यावर तुम्ही काहीच बोलत नाहीयत. महाविकास आघाडी आताच्या घडीला ही फुटलेली आहे. मतांपासून विभन्न झालेली आहे. एकमत नसल्याने ते वेगळे जाऊ शकतात. सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पुढेच आहे. तर उद्धव ठाकरे आम्ही हा अपमान सहन करणार नाही, असं म्हणतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सावरकरांच्या मुद्द्यावर भूमिका समजत नाहीय”, अशी टीका किरण पावसकर यांनी केलीय.
किरण पावसकर यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या मुद्द्यावर टीका केली असली तरी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना सावकरांवर टीका सहन करणार नाही, असं म्हणत आहे. पण काँग्रेस माघार घेण्यास तयार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय ते समजू शकत नाहीय. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुनही तीनही पक्षात मतभेद असल्याचं समोर येतंय.