केडीएमसीत आता फक्त नडायचं, शिवसेना-भाजप आमने-सामने
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीला फक्त 7 महिने उरले असताना भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील वाद आता चिघळणार आहे.
कल्याण : केडीएमसी स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेला भाजपने धक्का दिल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये रस्त्याच्या कामावरुन चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीला फक्त 7 महिने उरले असताना या दोन पक्षातील वाद आता चिघळणार आहे.
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नवनिर्वाचित केडीएमसीचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि इतर नगरसेवकांसोबत विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत गणपत गायकवाड यांनी शिवसेना आणि महापालिका अधिकाऱ्यांवर आरोप केला. “2014 साली रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून निधीचा वापर केला गेला नाही. रस्त्याचे काम रखडले आहे. आमदार काही काम करत नाही हे दाखविण्यासाठी अधिकारी सत्ताधारी शिवसैनिकांच्या दबावामुळे रस्त्यांचे काम करत नाही”, असा आरोप गायकवाड यांनी केला.
मात्र, आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांचे शिवसेनेच्या नेत्या आणि केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांनी खंडन केले. “हे काम प्रशासनाचे आहे. आमच्या पक्षाला दोष देणे चुकीचे आहे. एखादी बाब आमच्या निदर्शनास आमदारांनी आणून द्यावी. जनतेच्या विकासासाठी आम्ही ते काम पूर्ण करू”, असे महापौर विनिता राणे म्हणाल्या.
केडीएमसी स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. याचा परिणाम येणाऱ्या नगरसेवक निवडणुकीत दिसणार आहे. काही ना काही मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष आता आमनेसामने येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.