खातेवाटपावरुन अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यातच घमासान?
आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या घमासान झाल्याचं पाहायला मिळालं (Dispute in Ajit Pawar and Ashok Chavan).
मुंबई : राज्यात अनपेक्षितपणे झालेल्या महाविकासआघाडीच्या प्रयोगानंतर मोठ्या राजकीय उलथापालथ होऊन सत्ता स्थापन झाली. मात्र, त्यानंतर साधा मंत्रिमंडळ विस्तार होण्यासही मोठा काळ गेला. त्यानंतर आता खातेवाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच गुरुवारी (2 जानेवारी) आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या घमासान झाल्याचं बोललं जात आहे (Dispute in Ajit Pawar and Ashok Chavan). विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच हा वाद झाल्याचं मराठी वृत्तपत्र पुढारीने म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, ग्रामविकास किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली. त्यानंतर अजित पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केला. त्यानंतर अशोक चव्हाण संतापल्याचं सांगण्यात येत आहे. आम्हीही मंत्रिमंडळात आहोत. ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचं आहे ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असं अशोक चव्हाण यांनी अजित पवारांना सांगितलं.
चव्हाण संतापल्यानंतर अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण संयमी नेते असल्याचं म्हणत या वादाला आणखीच फोडणी दिली. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असंही अजित पवारांना म्हटलं. यानंतर पवार आणि चव्हाण यांच्यातील वाद आणखी वाढला. पवार यांच्या या वक्तव्यानंतर चव्हाण बैठकीतूनही बाहेर निघून गेले, असंही सांगितलं जात आहे.
अशोक चव्हाण यांनी महसूल खात्याची मागणी केली. तसंच यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचंच यातून समोर येत आहे. यावर तोडगा म्हणून आता तिन्ही पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचंही बोललं जात आहे.