नाराजीनाट्यावरून इंडिया आघाडीत बिघाडी, तर भाजपला सापडला निवडणुकीच्या विजयाचा रोड मॅप
अखिलेश यादव हे इंडिया आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. प्रकृतीच्या कारणास्तव नितीश कुमार यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. तर, इंडिया आघाडीच्या अशा बैठकीबाबत काहीच माहिती नसल्याचं ममता बॅनर्जीं यांनी सांगितलं. हेमंत सोरेन यांनीही बैठकीला उपस्थित राहायला नकार दिलाय.
मुंबई | 5 डिसेंबर 2023 : देशात तीन राज्यातील विधानसभेच्या निकाल लागला. भाजपची सत्ता तीन राज्यात आली. भाजपच्या या यशानंतर इंडिया आघाडीमध्ये मोठी खळबळ माजल्याची चर्चा सुरु झालीय. त्याला कारणही तसेच आहे. इंडिया (India) आघाडीची दिल्लीत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रामुख्यानं काही मुद्द्यावर चर्चा केली जाणार होती. यात तीन राज्यातील पराभवांची कारणे आणि लोकसभेतील जागावाटपावर चर्चा याची शक्यता होती. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीसाठी नव्या रणनीतीची आखणी करण्यात येणार होती. पण, ही बैठकच पुढे ढकलण्यात आलीय. या बैठकीत अनेक दिग्गज नेते गैरहजर राहणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली असली तरी नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेऊ.
अखिलेश यादव हे इंडिया आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. प्रकृतीच्या कारणास्तव नितीश कुमार यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. तर, इंडिया आघाडीच्या अशा बैठकीबाबत काहीच माहिती नसल्याचं ममता बॅनर्जीं यांनी सांगितलं. हेमंत सोरेन यांनीही बैठकीला उपस्थित राहायला नकार दिलाय.
शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी याबाबत बोलताना इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजीचा सुर आहे त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अखिलेश यादव थोडे नाराज आहेत. ममता बॅनर्जी यांनी येण्यास असमर्थता दर्शवलेली आहे. तरीही उद्धव ठाकरे हे आघाडीचा धर्म म्हणून एकत्र आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून इंडियामध्ये आम्ही होतो. काही लोकांचे समज गैरसमज असतील तर आमच्या मित्रपक्षांचे घटक पक्षाचे ते दूर व्हावे. काँग्रेसनं कोणती भूमिका या संदर्भात घेणं गरजेचं आहे. याच्यावर नक्कीच चर्चा होईल असे म्हटले आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या बातम्या पेरल्या जात आहेत अशी टीका केलीय. त्या सगळ्या बातम्या धादांत खोट्या होत्या. ममता बॅनर्जी असतील आणि नितीश कुमार असतील सगळेच राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकत्र येतील. पुन्हा इंडियाच्या मिटींगसाठी ते येत आहेत. सगळी रणनीती केली जाणार आहे असे पटोले यांनी स्पष्ट केलंय.
इंडिया आघाडीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरून सत्ताधारी यांना मात्र टीका करण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. इंडिया आघाडीत समन्वय राहिला नसल्याचा हल्लाबोल संजय शिरसाटांनी केलाय. आता ही आघाडी वगैरे काही राहणार नाही. आता त्यांचं एक धोरण वेगळं ठरेल. आपण स्वतंत्र लढू. निवडून आल्यानंतर एकत्र येऊ, बैठकीला जाऊ पण कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण या बैठकीचं मला मिळालेलं नाही. हे कारणं असतं. न जाण्याची ही कारणं आहेत. ज्यांच्याशिवाय बाकीच्यांना कुणाला त्या बैठकीमध्ये इंटरेस्ट नाही. बैठकांमध्ये जाणं बहुतेक नेते टाळणार आहेत, अशी टीका त्यांनी केलीय.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पावर यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. भाजपकडे सत्ता, पैसा आणि ताकद आहे. त्यामुळेच भाजप विरोधात लढण्यासाठी एक राहण्याची गरज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. आदरणीय पवार साहेब त्याबाबत निर्णय घेतील. पण, सगळ्याच पक्षांना एक विनंती आहे की भाजपकडे ताकद आहे. सत्ता आहे, पैसा आहे आणि अशा बलाढ्य पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला प्रयोग करावे लागतील. लोकं आपल्या बाजूने आहेत असे मत त्यांनी व्यक्त केलंय.