नवी दिल्ली : मुंबईत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत राज्यप्रमुखांच्या भेटीसाठी गेले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, तीन महिन्यांच्या पूर्वी आम्ही तुम्हाला अस्मान दाखविलं आहे. त्यामुळं तुम्ही आता आम्हाला अस्मान दाखवण्याची गरज नाही. आम्ही ठेचा खाऊन मोठे झालोय म्हणून त्यांना ठेचलंय. महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम हे छोटं काम नव्हतं.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला म्हटलं बाप चोरणारी टोळी. आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही सैनिक आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता. पण, आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहात, असं आम्ही म्हणायचं का, असा सवालही शिंदे यांनी केला.
लोकांची मनं आणि लोकांची मतं बघा. जनतेच्या भावनेचा आदर करा. आम्ही टीका करणार नाही. पण, कामाने तुम्हाला उत्तरं देऊ. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास दाखविला. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची लहर देशभर येईल.
दोन महिन्यात चारशे-पाचशे निर्णय लोकांच्या हिताचे घेतले आहेत. अडीच महिन्यात येवढे निर्णय झालेत, तर अडीच वर्षात काय होईल, याची भीती काही लोकांना वाटायला लागली आहे.
देशाचा विकास करणाऱ्यांसोबत आम्ही गेलो आहोत. तुमच्यासारखे आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलेलो नाहीत. याचा आम्हाला अभिमान आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. घरी बसणारा नेता नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी केली.