Osmanabad : ‘उद्धव ठाकरे घाबरु नका’, अजित पवारांनी दिला काकांच्या संघर्षाचा दाखला..!
बंडखोर आमदार हे सत्तेत असले तरी ते कायम सत्तेतच राहतील असे नाही. गद्दारांना लोक स्विकारत नाहीत, हा इतिहास आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे देत अजित पवारांनी प्रथमच भर सभेत ठाकरेंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
संतोष जाधव Tv9 मराठी, उस्मनाबाद : सत्तेचे गणित वेगळे आहे. कुण्या एकाच्याच हाती सत्ता राहिल असे नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी हुरळून जाऊ नये आणि ज्यांनी सत्ता उपभोगली (Enjoyed power) नाही त्यांनी खचून कधी जाऊ नये. सध्या शिवसेना (Shivsena) आणि पक्ष प्रमुखांवर अडचण आहे. पण यामुळे खचून न जाता संघर्षाची तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. संघर्षाचा हवाला देताना अजित पवार यांनी आपल्याच काकांचे उदाहरण दिले आहे. तीन वेळेस निवडून आलेले राहुल मोटे पडले, राणाजगजितसिंह यांना काही कमी पडू दिले नाही तरी ते सोडून गेलेच, पण यामुळे शरद पवार कधीच खचून गेले नाहीत. परस्थितीशी दोन हात करीत त्यांनी पुन्हा आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे तुम्ही घाबरुन जाऊ नका असा दिलासा अजित पवारांनी दिला आहे.
बंडखोर आमदार हे सत्तेत असले तरी ते कायम सत्तेतच राहतील असे नाही. गद्दारांना लोक स्विकारत नाहीत, हा इतिहास आहे. यापूर्वी नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड केले त्यांना जनतेने नाकारलेच. ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाभळी, त्यामुळे जशाच तसे उत्तर देण्याची तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे पवारांनी सांगितले आहे.
देशाच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणनंतर शरद पवार महत्वाची भूमिका पार पडतात हे नाकारू शकत नाही. महिलांना 33 टक्के राजकारणात आरक्षण दिले हे निर्णय शरद पवरांमुळेच झाले. मात्र, काही मोजक्या लोकांच्या चुकांमुळे सर्वसामान्य जनतेलाही त्याची किंमत मोजावी लागल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातील जिल्हा बॅंका ह्या अडचणीत आहेत. केवळ अपवाद आहे तो लातूर जिल्हा बॅंकेचा. उस्मानाबाद जिल्हा बॅंकेचीही दैयनिय अवस्था झाली आहे. सहकार क्षेत्रामुळेच राज्यात मोठा बदल झाला आहे. त्या विश्वासाला तडा जाता कामा नये असेही अजित पवारांनी सांगितले.
निवडणुकीत मते मागायची पण जनतेच्या कामांकडेच दुर्लक्ष करायचे हे असे आता चालणार नाही. त्यामुळे सर्वांनीच सावध होणे गरजेचे आहे. शिंदे सरकारच्या काळात तर घोषणांचा पाऊस होतोय पण स्थानिक पातळीवरील स्थितीही लक्षात घेणे तेवढेच गरजेचे आहे.
शिंदे सरकारमध्ये आदर तर सोडाच पण गुंडगिरीचीच भाषा सुरु आहे. बघून घेतो, मराठ्यांना खाज सुटली अशी वाक्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाहीत. शिवाय असले राजकारण राज्यालाही न परवडणारेच आहे. जनताच याला उत्तर देईल असेही अजित पवारांनी सांगितले.
दसऱ्या दिवशी प्रथम आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तर त्यांचे विचार हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे असतात. तसेच एकसंघ, जातीय सलोख्याचे असतात. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर इतरांचे असेही त्यांनी भर सभेत सांगितले.