मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका : अजित पवार
बारामती : कार्यकर्त्यांनी आपल्याला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. अगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल यावर लक्ष दिलं पाहिजे. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण होतं आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झालीय, असंही सांगायला ते विसरले नाहीत. या निमित्ताने […]
बारामती : कार्यकर्त्यांनी आपल्याला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. अगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल यावर लक्ष दिलं पाहिजे. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण होतं आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झालीय, असंही सांगायला ते विसरले नाहीत. या निमित्ताने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांमध्ये कसलाही फटका बसू नये याची दक्षताच अजित पवार यांनी घेतल्याचं दिसतंय.
बारामती तालुक्यातल्या पणदरे येथील उत्कर्ष लॉन्सचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान असा उल्लेख करु नये असं आवाहन केलं. या उल्लेखामुळे मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात आणि त्यातून पाडापाडी होऊ शकते. त्यामुळे असा उल्लेख टाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला बहुमत कसं मिळेल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. त्याचवेळी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, “अजित पवार काय बोलतात यावरच लक्ष असतं.. अटेंशन.. ब्रेकिंग न्यूज..” असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच केवळ राजू शेट्टी यांच्या उमेदवारीच्या शक्यतेमुळे आणि त्यांना खासदारकी हवी होती म्हणून निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिलीय.
शिवसेना आणि भाजप एकाच माळेचे मनी असून उद्धव ठाकरे भाजपमुळे 25 वर्षे सडली असं सांगतात. मग त्यांच्यासोबत कशाला राहता असाही टोला अजित पवारांनी लगावला आणि यांचं नेमकं काय चाललंय हेच कळत नसल्याचंही ते म्हणाले.
जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूर मातूर उत्तरं देतंय. पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपची पिछेहाट झालीय. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचीही टीका अजित पवार यांनी केली.