आम्हाला आता वर्तमानपत्र, वृत्तवाहिनीत शिंदे गट असं संबोधू नका, पत्र लिहून विनंती
गेली अनेक वर्ष ठाकरे घराणे, शिवसेना आणि धनुष्यबाण यांचे नाते निवडणूक आयोगाने संपवले. पण, ग्रामीण भागात, खोडोपाड्यातील जनतेच्या मनात असलेले शिवसेना हे नाव पुसले जाणार नाही.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले तरी नजरेसमोर येते ते शिवसेना ही चार अक्षरांची संघटना. १९६६ पासून शिवसैनिकांची नाळ या अक्षरांसोबत जुळली गेली आहे. शिवसेनेने आतापर्यंत कधी ढाल-तलवार तर कधी इंजिन अशा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविली. पण, नंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह शिवसेनेला 1989 साली मिळाले. शिवसेना या पक्षाला जसा इतिहास आहे तसा धनुष्यबाण या चिन्हाचाही एक इतिहास आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेले काही महिने सुरु असलेला पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद निवडणूक आयोगाने सोडवला आहे. १९६६ पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची धुरा त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड ( उठाव ) केले. हा वाद निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला.
1989 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते. परभणी या जिल्ह्यातून कै. अशोकराव देशमुख यांना धनुष्यबाण तर विरोधी उमेदवार मोरेश्वर साळवे यांना मशाल चिन्ह मिळाले होते. या निवडणुकीत अधिक देशमुख निवडून आले आणि त्या विजयामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे कायमच चिन्ह मिळाले.
1990 साली झालेल्या विधानसभा निवडणुक शिवसेनेने याच धनुष्यबाण चिन्हावर लढवल्या आणि शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. तेव्हापासून आजमितीस धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाते कायम राहिले आहे. शिवसेना पक्ष पुढील राजकीय वाटचालीत आपल्या लक्ष्याचा असाच वेध घेणार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या चिन्हावर शिक्कामोर्तब केले.
गेली अनेक वर्ष ठाकरे घराणे, शिवसेना आणि धनुष्यबाण यांचे नाते निवडणूक आयोगाने संपवले. पण, ग्रामीण भागात, खोडोपाड्यातील जनतेच्या मनात असलेले शिवसेना हे नाव पुसले जाणार नाही. अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर, एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह दिले.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. मात्र, अधिकृत घोषणा होऊनही अजूनही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल माध्यमांमधून शिंदे गट असाच उल्लेख करण्यात येत आहे. याबाबत शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे.