‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

| Updated on: Feb 28, 2021 | 4:42 PM

राजीनामा तुमच्याकडेत ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे.

राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र
संजय राठोड आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याची माहितीही मिळत आहे. पण असं असलं तरी राठोड यांचं मुख्यमंत्र्यांवर अजूनही दबावतंत्र सुरुच असल्याचं कळतंय. कारण, राजीनामा तुमच्याकडेत ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचं राठोड यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.(Sanjay Rathod’s request to Uddhav Thackeray)

राठोड यांनी आज सपत्निक मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

संध्याकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जाणार की नाही? याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे विरोधी पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आपण राजीनामा देतो पण जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा स्वीकारु नका अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. राठोड यांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असं मत शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. माध्यमांना मला उत्तरं द्यायची आहेत, विरोधी पक्षाला उत्तर द्यायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती मिळतेय.

अखेर राठोडांची विकेट

मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

Sanjay Rathod’s request to Uddhav Thackeray