7 ते 8 आमदार संपर्कात, 1 तारखेला वेगळा निर्णय…. रवी राणांच्या खोक्यांवरील आरोपांवरुन बच्चू कडू संतापले
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिंदे-फडणवीस सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे.
मुंबई : रवी राणांच्या खोक्यांवरील आरोपांवरुन बच्चू कडू संतापले आहेत. पुरावे द्या,नाहीतर 1 तारखेला 7 ते 8 आमदार निर्णय घेऊ असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिंदे-फडणवीस सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या दोघांमधील वाद पोहचला आहे.
7 ते 8 आमदार संपर्कात असून, 1 तारखेला वेगळा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये बच्चू आहेत. रवी राणांनी जो खोक्यांचा आरोप केला, त्यावरुन बच्चू कडूंनी पुरावे देण्याचं आव्हान दिले आहे.
त्यामुळं 1 तारखेपर्यंत एक तर राणांनी खोके घेतल्याचे पुरावे द्यावे नाही तर शिंदेंनी योग्य पावलं उचलावी.अन्यथा वेगळा निर्णय घेणार असा इशारा बच्चू कडूंनी मुख्यमंत्री शिंदेंनाच दिला.
7 ते 8 आमदारांसह बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार का ? 7 ते 8 आमदारांसह बच्चू कडू आमदार रवी राणांच्या विरोधात मोहीम सुरु करणार का ? 7 ते 8 आमदारांसह बच्चू कडू, रवी राणांना माफी मागण्यास भाग पाडणार का ? 7 ते 8 आमदारांसह बच्चू कडूंचा शिंदे गटातच फूट पाडण्याचा प्रयत्न आहे ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता 7 ते 8 आमदारांनी जर वेगळा निर्णय घेतला संख्याबळावर फारसा परिणाम होणार नाही. शिंदे गटाकडे शिवसेनेतून बंड पुकारलेले 40 आणि इतर तसंच अपक्ष 10 आमदार, असे एकूण 50 आमदार आहेत.
आता यापैकी बच्चू कडूंच्या संपर्कात नेमके कोणते आमदार आहेत, 40 मधले आहेत की 10 अपक्षांमधले ही महत्वाची बाब आहे. 2 तृतियांशनुसार, शिंदे गटाकडे शिवसेनेतून बंड पुकारलेल्यांपैकी 37 आमदार सत्ता टिकवण्यासाठी गरजेचे आहेत, सध्या शिंदेंकडे 40 आमदार आहेत 10 अपक्षांपैकी 8 आमदार जरी बच्चू कडूंच्या संपर्कात असेल आणि त्यांनी पाठींबा काढला तरी सरकार पडणार नाही.
बच्चू कडू संतापण्याचं कारण आहे गुवाहाटीला जाण्यासाठी उघडपणे खोके घेतल्याचा केलेला आरोप. त्यामुळं बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.
1 नोव्हेंबरला प्रहारचे 5 हजार कार्यकर्ते अमरावतीच्या टाऊन हॉलमध्ये जमणार आहेत. याच टाऊन हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बच्चू कडू राणांच्या खोके घेतल्याच्या पुराव्याची वाट पाहणार आहेत.
तर, विरोधक बच्चू कडूंची ही वेगळी खेळी असल्याचं बोलत आहेत. बच्चू कडूंना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळं बच्चू कडूंचा हा एकप्रकारे प्रेमभंग झाल्याची टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी केली आहे.
आता 1 तारखेला राणा पुरावे देणार, मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार की मग बच्चू कडू कोणता निर्णय घेणार ? याकडे अमरावती जिल्हाच नाही तर महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.