शिंदे गट मिंधा की खंदा यांचा निर्णय जनताच घेईल; उद्धव ठाकरेंनंतर आता ‘या’ नेत्याचाही शिंदे गटावर घणाघात
सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. आता यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतआहेत.
मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. आता याविरोधात शिवसेनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यावर शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल, त्यासाठी न्यायालय आम्हाला परवानगी देईल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी मनसे आणि शिंदे गटावर देखील निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले परब?
अनिल परब यांनी यावेळी बोलताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गट मिंधे की खंदे हे जनताच ठरवेल असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला होता. आता त्यानंतर अनिल परब यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
अनिल परब यांनी केवळ शिंदे गटावरच नव्हे तर मनसेवर देखील निशाणा साधला आहे. मनसेला फक्त इशाराच देता येतो असा टोला परब यांनी लगावला आहे.
‘शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा’
अनिल परब यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल. आम्ही याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. न्यायालय आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.
तसेच काल उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून खरी शिवसेना कोणाची आहे? आणि शिवसैनिक कोणासोबत आहेत याचा तर अंदाज आलाच असेल असंही परब यांनी म्हटलं आहे.