दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टात, शिवसेनेची कुणाविरोधात याचिका?
शिवसेनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहून न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय.
कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava ) महापालिकेने परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेनं हायकोर्टात (High court) धाव घेतली आहे. लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीमुळे शिवसेनेला पक्षचिन्हापासून प्रत्येक गोष्टीसाठी आता संघर्ष करावा लागतोय. अगदी अनेक वर्षांपासूनच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झगडा करावा लागतोय.
शिवसेनेने अनेक दिवसांपासून महापालिकेकडे शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. मात्र महापालिकेकडून ती देण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र दोन्ही गटांना यासाठी परवानगी मिळत नसताना दिसल्याने शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर तयारी केल्याची माहिती हाती आली आहे.
शिवसेनेची कोर्टात धाव
बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पालिकेच्या वतीने वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद केला जाईल.
सध्याचं राजकारण पाहता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी एखाद्या गटाला परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका महापालिकेने काल घेतली होती.
शिवसेना कुणाची, पक्ष नेमका कुणाचा, हाच प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेकडून शिवसेनेच्या अर्जावर काहीही उत्तर देण्यात आले नाही. यावर कोणताही निर्णय घेणं हे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारं ठरू शकतं, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. त्यामुळे गृहविभाग यासंदर्भात निर्णय घेईल, असंही म्हटलं जात होतं.
उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता येईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे. हायकोर्टानं शिवसेनेची याचिका दाखल करून घेतली असून उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
खैरे काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहून न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय. आम्ही शिवसैनिकांनी तयारी केली आहे. राज्यभरातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत धडकणार आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी tv9 शी बोलताना दिली.