Dussehra Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते जाणार नाहीत- सूत्र
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा, आणि बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा...?
सुमित सरनाईक, TV9 मराठी, मुंबई : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) भाजप (BJP) नेते जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे गटाचा दसरा मेळावा उद्या (5 ऑक्टोबर, बुधवार) बीकेसीवर होणार आहे. या मेळाव्याला केंद्रातील भाजपचे बडे नेते येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता शिंदे गट स्वतः बीकेसीवर (BKC Dussehra Melava Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सांगितलं जातंय.
शिंदे गट स्वतः शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं भाजपने या दसरा मेळाव्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. सुरुवातीला भाजपचे नेते बीकेसीतील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता भाजपचे नेते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता कमीच असल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर शिंदे गटाने बीकेसीवर दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार आपआपल्या मतदार संघातून कार्यकर्त्यांना घेऊन बीकेसीवर जमणार आहेत.
बीकेसीतील मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. अशातच भाजपचे नेते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार नसल्यानं भाजपचा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा आहे नाही? यावरुन चर्चांना उधाण आलंय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या दसरा मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यासाठीही जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलीय. दरम्यान, दसरा मेळाव्याआधीच शिवाजी पार्क आणि बीकेसी परिसर बॅनरमय होऊन गेलेत.
चोख बंदोबस्त
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. संभाव्य राजकीय संघर्ष पाहता मुंबई पोलिसांकडूनही चोख पोलीस बंदोबस्ताची तयारी करण्यात आलीय. मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणारी वाहनं पाहता वाहतूक पोलिसांवरही ताण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आलीय.
शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी पार्किंगची जागा ठरवण्यात आलीय. सेनापती बापट मार्गावर बसच्या पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलीय. तसंच एल्फिन्स्टन परिसरातील कामगार मैदानात बस पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलीय. तर इंडियाबुल्स फायनान्स, कोहिनूर इमारतीजवळ चारचाकींसाठी परवानगी देण्यात आली असून फाईव्ह गार्डन, नाथलाल पारेख मार्गावरही परवानगी देण्यात आलीय.
दरम्यान, शिंदे गटाला BKC परिसरातील अनेक मोकळ्या जागा पार्किगसाठी राखीव ठेवण्यात आलीय. मोकळी मैदाने, MMRDA ग्राउंडवरही पार्किंगची सोय करुन दिली जाणार आहे.