एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी 1 हजार रुपये?
बीकेसीत शिंदे गटाचा तर शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार! कोणाच्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होते, यावरुनही चर्चांना उधाण
दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. पैसे देऊन शिंदे गटाचे (Eknath Shinde Dussehra Melava) आमदार दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवत आहेत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. शिंदे गटाचे आमदार गद्दार आहेत, त्यांची शिवसैनिकांशी बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा आणि दसरा मेळावा (Dussehra Melava News) याची तुलनाही करु नये, असंही ते म्हणाले.
इतकंच नव्हे तर गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शिंदे गटाचे आमदार देत असून त्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला, याचा आकडाही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितला. ते औरंगाबादमध्ये टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.
चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय, की..
अनेक वर्ष आम्ही दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जातोय. आजही जाणार आहोत. कोणतंही विघ्न न येता मेळावा यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना आम्ही देवीजवळ केली आहे.
दरम्यान, औरंगाबादमधून 500 गाड्या शिंदे गटाच्या वतीने सोडण्यात आल्या असून 25 हजार लोकंही त्यांच्यासोबत गेल्याचा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना विचरण्यात आला. त्यावर उत्तर देताना चंद्रकात खैरे यांनी म्हटलंय की,
त्यांचं काही मला विचारु नका. ते गद्दार आहेत, गद्दारांशी कशी बरोबरी करायची? प्रत्येकाला 1 हजार रुपये दिलेत त्यांनी! 52 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेत. हा आकडा जास्तही असू शकतो. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हे पाप गद्दार करत आहेत.
त्यांच्या मेळाव्यावा 3 लाख येऊ दे, नाहीतर 5 लाख येऊ दे.. ते पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. उद्धव ठाकरे या सगळ्यांचा समाचार घेतील. लोकांची श्रद्धा बाळासाहेबांवर आणि त्यांच्या चिरंजीवावर आहे.
पाहा व्हिडीओ : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे लाईव्ह
औरंगाबादेतून दसरा मेळाव्याला निघण्याआधी चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केलीय. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी सभा होईल. या सभेला निघण्याआधी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दावने यांनी कर्णपुरा देवीची प्रार्थना केली.
औरंगाबादची ग्रामदैवता असणाऱ्या कर्णपुरा देवीची शिवसैनिकांसोबत आरती करण्यात आली. ही आरती झाल्यानंतर खैरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. आज होणाऱ्या ठाकरे विरुद्ध शिंदे अशा दसरा मेळाव्यात कुणाकडे जास्त गर्दी जमते, याकडे महाराष्ट्राची नजर लागलीय.