अरे आवाsssज कुणाचा? बीकेसीसोबत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील आवाजाची आकडेवारीही समोर!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात जास्त आवाज होता की बीकेसीच्या दसरा मेळाव्यात? आकडेवारी नेमकं काय खुणावते?
मुंबई : दसरा मेळावा झाला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या (Dussehra Melava Politics) प्रतिक्रियांचं राजकारण रंगलंय. अशातच एक महत्त्वाची आकडेवारी समोर आलीय. कुणाच्या दसरा मेळाव्यात नेमका किती आवाज होता, याचे आकडे समोर आले आहेत. आवाज फाऊंडेशनच्या (Awaaz Foundation) वतीने घेण्यात आलेल्या नोंदीनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्यात बीकेसीच्या तुलनेत जास्त आवाज होता, असं समोर आलं आहे. विशेष म्हणजे 2019च्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तुलनेत यंदाचा दसरा मेळावा जास्त आवाजाचा होता.
बुधवारी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. न्यायालयीन संघर्षानंतर ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यात यश आलं होतं. या दसरा मेळाव्यात आतापर्यंतचा सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली, असं वृत्त टाईम ऑफ इंडियाने दिलंय.
आवाज फाऊंडेशनच्या हवाल्याने देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 101.6 डेसीबल इतका आवाज 2022 च्या अर्थात यंदाच्या दसरा मेळाव्यात नोंदवला गेला. 2019 साली घेण्यात आलेल्या दसरामेळाव्यात 93.9 डेसीबल इतक्या आवाज नोंदवला गेला होता.
विशेष म्हणजे बीकेसीच्या तुलनेत शिवाजी पार्कचा आवाज जास्त होता, असंही आकडेवारीतून समोर आलंय. बीकेसीत शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. बीकेसीत झालेल्या दसरा मेळाव्यात 91.6 डेसीबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली.
बीकेसीतील आवाज जरी कमी असला, तर तो अपेक्षित आवाजापेक्षा जास्तच होतं, असंही सांगितलं जातंय. शिवाजी पार्क परिसर हा सायलेन्स झोनमध्ये येतो. मुंबई हायकोर्टाने दहा वर्षांआधीच शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात आवाजाच्या मर्यादेचा मुद्दा हा नेहमीच चर्चेत येत असतो.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळी रेकॉर्डब्रेक आवाज नोंदवला गेला. 97 डेसीबल इतक्या आवाजाची नोंद पेडणेकर यांच्या भाषणावेळी करण्यात आली. तर ढोल वाजवण्यामुळे 101.6 डेसीबल इतका आवाज नोंदवला गेल्याचंही अभ्यासातून समोर आलंय.
शिवाजी पार्क परिसरात रस्त्यावर शाळा आणि नर्सिंग होम शेजारी ढोल वाजवण्यात आल्याचंही नोंदवण्यात आलंय. तसंच यंदाचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हा 2019च्या तुलनेत 2 तास जास्त वेळ चालला.
एकूण तीन तास बुधवारी दसरा मेळाव्याचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर पार पडला. महत्त्वाचं म्हणजे 2019 साली झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी 94 डेसीबल इतक्या आवाजाची नोंद शिवाजी पार्कवर करण्यात आली होती.
लोकवस्तीच्या भागात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डेसीबल इतक्या आवाजाची मर्यादा घालून देण्यात आलीय. तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 45 डेसीबल इतक्या आवाजाची मर्यादा घालून देण्यात आलीय.
बीकेसीवर झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी 89.6 डेसीबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली. तर बीकेसीवर असलेल्या म्युझिकचा आवाज हा 91.6 डेसीबल इतका नोंदवला गेल्याचं आवाज फाऊंडेशन केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.