भूकंपाने खासदार हेमंत पाटलांनी रात्र जागून काढली, अजूनही नागरिक भयभीत
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले.
औरंगाबाद/नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. यामुळे काही घरांना तडे गेले आहेत, ज्यामुळे नागरिक रस्त्यावर आले. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 8-10 सेकंदासाठी धक्के जाणवले, ज्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. नांदेडमध्ये 3.9 रिश्टर स्केल भूकंप नोंदवण्यात आला.
हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी भूकंपग्रस्त भागात दौरा करुन, रात्र जागून काढली. हेमंत पाटील यांनी भूकंप झालेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यात रात्रभर दौरा करत लोकांच्या भेटी घेतल्या. पुन्हा भूकंप होईल या अफवेने लोक प्रचंड घाबरलेले होते, या लोकांना दिलासा देण्याचं काम खासदार पाटील यांनी केलं.
भूकंपामुळे काही भागात झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. या दरम्यान प्रशासनाशी समन्वय साधत पाटील यांनी भूकंपामुळे घाबरलेल्या लोकांना दिलासा दिला.
यवतमाळमध्ये धक्के
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, आणि परिसरात काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे काही लोकांच्या घरातील भांडी पडले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काल रात्री 9 वा 10 मि. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर लोक रात्रभर बाहेर झोपले. आजही 12 तासांनंतर लोक आपल्या घरांमध्ये जायला घाबरत आहेत.
कुठे-कुठे भूकंपाचे धक्के?
हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
नांदेड – जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही.
यवतमाळ – जिल्ह्यातील महागाव, फुलसावंगी, उमरखेड, भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही घरांनाही तडे गेले. यानंतर तहसीलदार गावांमध्ये दौऱ्यासाठी रवाना झाले.
पर्यावरण तज्ञांचं म्हणणं काय?
पर्यावरणतज्ञांच्या मते भूगर्भातील हालचालींमुळे हे धक्के जाणवतात. शिवाय मानवाची निसर्गातील ढवळाढवळही याला कारणीभूत आहे. राजेंद्र फातरपेकर यांच्या मते, “महाराष्ट्राचा बराच भाग भूकंप प्रवण क्षेत्रात आहे. जैतापूरचा प्रकल्पही त्याच रेषेवर आहे. भूकंप प्रवण रेषेवर हा प्रकल्प आहे. या अवस्थेत भूकंपाचे धक्के कधीही जाणवू शकतात. अणू प्रकल्प तिथे लादणे धोकादायक आहे. ही भूगर्भातील घटना असली तरी आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करत असल्यामुळे हा प्रकार होत आहे. धक्के कधीही जाणवू शकतात.”
संबंधित बातम्या
विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, घरांनाही तडे, लोक रस्त्यावर