गिरीश महाजन हास्यवदनी, अजितदादा धोकेबाज… एकनाथ खडसे कडाडले
गिरीश महाजन हास्यवदनी आहेत, ते नेहमी वेगवेगळ्या दिशेने पाहत स्मितहास्य करत असतात. त्यामुळे त्यांनी जे स्मित हास्य केलं त्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या एक रुपयाच्या दाव्यावर मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं. त्यावरून नाथाभाऊंनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 19 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं. त्यांना आयुष्यभर राजकारण शिकवलं, वरच्या पदापर्यंत नेलं, बोट धरून राजकारणातले डावपेच शिकवले. तेच अजित पवार शरद पवार यांना सोडून गेले. अशा अजित पवार यांच्यासाठी धोकेबाज हा शब्दच बरोबर आहे. यापेक्षा दुसंर काय वेगळं ट्विटरवर बोलणार? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या समन्सवरही भाष्य केलं. रोहित पवार यांना ईडी समन्स येणे अपेक्षित होतं. बारामती ॲग्रोवनवर ज्या दिवशी रेड पडली, त्याच दिवशी हे राजकीय षडयंत्र होणार असल्याचे लक्षात आलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना नामोहरण करण्यासाठी अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. अशाच पद्धतीने राजन साळवी यांच्यावरही कारवाई झाली. भाजप ईडीचा, इन्कम टॅक्सचा वापर करून देशात दहशतीचे वातावरण तयार करत आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध बोलला तर तुमच्या विरुद्ध आम्ही एक शस्त्र उगारू अशा पद्धतीने हे षडयंत्र केलं जातं आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
अनियमितता फक्त विरोधकांच्या…
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधातही ईडीने समन्स बजावलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांवरच कारवाई केली जात आहे. मात्र अनियमितता ही फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का? सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदारावर, एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही. अजितदादा असतील किंवा त्यांच्यासहीत इतर असतील, जे भाजपमध्ये जातात ते स्वच्छ होतात. असं भाजपकडे वॉशिंग मशीन आहे. त्यात या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा अशी ही मशीन आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
आता पळ का काढता?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. सरकारकडून गेल्या एक ते दोन महिन्यांपासून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. सरकारला ओबीसींना वगळून सगळ्यंना आरक्षण देणे शक्य नाही. मंत्री गिरीश महाजन असतील किंवा इतर मंत्री हे अंतरवलीत गेले. त्यांनी लिहून दिलं. त्याची अंमलबजावणी करावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. तुम्ही जर लिहून दिलं तर अंमलबजावणी का करत नाही? आता का पळ काढत आहात? असा सवाल त्यांनी केला.
एकदाचा काय तो निर्णय द्या
छत्रपतींची शपथ घेऊन हे सरकार म्हणते की, आम्ही ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ. तर दुसरीकडे म्हणतात की, आम्ही कुणब्यांनाच आरक्षण देऊ. त्यामुळे काय करायचे ते करा. मात्र एकदाचा काय तो निर्णय स्पष्ट करा, असंही ते म्हणाले.