मुख्यमंत्री महोदय, मला भ्रष्टाचाराचा डाग घेऊन जायचं नाही, खडसे भावूक
माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली, त्यात काहीही तथ्य नव्हतं, आता आरोप करणारावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी केला. मला या सभागृहातून आरोपांचा डाग घेऊन जाण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुंबई : सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करुन सत्ता मिळाल्यानंतर त्यापासून दूर रहावं लागण्याचं दुःख काय असतं हे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याशिवाय दुसरं कुणीही सांगू शकत नाही. त्यांच्या या भावनांना त्यांनी पुन्हा एकदा वाट मोकळी करुन दिली. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली, त्यात काहीही तथ्य नव्हतं, आता आरोप करणारावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी केला. मला या सभागृहातून आरोपांचा डाग घेऊन जाण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आपल्यावर झालेल्या आरोपांवर बोलताना एकनाथ खडसे अत्यंत भावूक झाले. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्याना विनंती आहे की आरोपांचा डाग घेऊन सभागृहातून जायची संधी देऊ नका. माझे जावई, नातू आणि कुटुंबीयांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहिल? त्यामुळे ज्यांनी पुरावे दिले त्यांचीही चौकशी करण्यात यावी ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. खोटे आरोप केले असतील तर त्यांना शिक्षेचा कायदा करा, असं एकनाथ खडसे म्हणाले.
या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. सभागृहाला एकनाथ खडसेंनी त्यांच्यावरील आरोपांची तळमळीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि ते भावूक झाले. मी जे भोगलं त्याबद्दल आजही मनात वेदना आहेत. कुणाच्या जीवनात हा प्रसंग येऊ नये. माझ्या आयुष्यात यापेक्षा वाईट होण्याची शक्यता नाही. माझ्यावर सभागृहातील एकही सदस्याने आरोप केले नाहीत. आरोप करणारे बाहेरचे होते, असंही खडसे म्हणाले.
माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बायकोशी बोलल्याचे संबंध जोडले गेले. नाथा भाऊमध्ये तिला एवढं काय आवडलं? आमचं सरकार पारदर्शी असल्यामुळे चौकशी झाली. चौकशीत समोर आलं की माझं दाऊदच्या बायकोशी कुठलंही संभाषण झालं नाही. आता माझ्यावर आरोप करणारा मनीष भंगाळे कुठे आहे? रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला होता का? नंतर आरोप झाला नाथा भाऊंच्या जावयाने लिमोझिन कार घेतली. त्यावर मीडियाने बदडलं. नंतर पीएने पैसे घेतल्याचा आरोप झाला. पुन्हा एमआयडीसीची जमीन घेतल्याचा आरोप झाला. मी एक इंचही जमीन घेतली नाही. व्यवहार बायकोच्या नावावर होता आणि सात बारामध्ये जमीन मालकाचं नाव होतं. माझ्यावर अंजली दमानिया यांच्याकडून आरोपांवर आरोप करण्यात आले. दमानियाबाईंचं वजन एवढं दांडगं होतं की माझ्यावर आयकर विभागाच्या रेड पडल्या. माझ्या आयुष्यात वडिलोपार्जित इस्टेटशिवाय काही नाही. वडील श्रीमंत होते. माझ्या शेतीच्या व्यतिरिक्त एकही उद्योग नाही. आयुष्यात पथ्य पाळलं. इतर उद्योग करायचे टाळले. मी काय चोर, बदमाश आहे का? एवढ्या चौकशा कशा झाल्या? एवढे आरोप झाले की एका सन्माननीय सदस्याला या सभागृहातून जाताना वेदना होत आहेत, असं म्हणत खडसे भावूक झाले.