खडसेंच्या जळगावात राष्ट्रवादीचं वारं, नेटकरी म्हणतात…
कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. | Eknath Khadse may join NCP
जळगाव: भाजपमध्ये बऱ्याच काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. (Eknath Khadse buzz on Social Media)
एकनाथ खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे संभ्रमात पडलेले कार्यकर्ते खडसे यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे याच कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. सोशल मीडियावर ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’ असा मजकूर असलेल्या अनेक पोस्ट फिरत आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजप वाढवणाऱ्या एकनाथ खडसेंसारख्या बड्या नेत्याला राष्ट्रवादीत घेताना मोठी जबाबदारी द्यावी लागणार हे निश्चित आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तार आणि भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल आणि मुक्ताईनगरला पुन्हा एकदा लाल दिवा मिळेल, अशी आशा नागरिकांना आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त जागेवर एकनाथ खडसे यांची वर्णी लागू शकते. त्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे शिफारस केली जाईल. खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग येईल. तसेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडीत कोणती जबाबदारी द्यायची, याबाबतही सध्या विचार सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. हे खाते सध्या शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या रुपाने कृषीमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेल्यास शिवसेनेला गृहमंत्रीपद देऊन त्याची भरपाई केली जाईल.
भाजपकडून समजूत काढण्याचे प्रयत्न
भाजपकडून एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा एकनाथ खडसे यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती. पण वैयक्तिक कारण देत कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचं खडसेंनी महाजनांना कळवलं.
भाजप कार्यकारिणीच्या मुंबईतील बैठकीला एकनाथ खडसे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्नही केला होता. ‘एकनाथ खडसे यांनी आमच्या दोन थोबाडीत द्याव्यात. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर जाऊन नाराजी व्यक्त करू नये’, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
ठाकरे सरकारमध्ये एकनाथ खडसेंचं स्थान जवळपास निश्चित, कृषिमंत्रीपद मिळण्याची चिन्हं
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार का; छगन भुजबळांचे सूचक हास्य
17 ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना?; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
(Eknath Khadse buzz on Social Media)