…तर मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता!- एकनाथ खडसे
विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना महत्वाचं विधान केलंय.
रवी गोरे, जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगावमध्ये बोलताना महत्वाचं विधान केलंय. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत यायच्यावेळी साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, असं खडसे म्हणालेत. जरी महाविकास आघाडी असेल तरी आपण आपला पक्ष मजबूत केला पाहिजे.संघटन वाढवलं पाहिजे. जनसंपर्क वाढवला पाहिजे. आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील तायकडे लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं खडसे म्हणालेत. बोदवड इथे एका कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
आपला मित्र पक्ष मजबूत असला तर आपण ही मजबूत असू शकतो. आपल्या महाविकास आघाडी पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. तीन पक्ष मिळून हे सरकार येऊ शकत हे शरद पवारांनी करून दाखवलं होतं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असं खडसे म्हणालेत.
शिवसेनेतील वादावरही खडसे बोलते झाले. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, असं खडसे म्हणालेत.
शिंदे सरकार येईल असं ही वाटलं नव्हतं. आपलंही तीन पक्षाचे सरकारी येईल, असेही वाटलं नव्हतं. मात्र चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं सरकार राज्यामध्ये येणार असल्याचं खडसे म्हणालेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने एकत्र निवडणुका लढवल्या. तर भाजपाचा विजय निश्चित आहे. तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल. घोडा मैदान जवळ आलंय. त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.