Khadse vs Mahajan : खडसे, महाजनांनी एकमेकांची लायकी काढली! महाजनांनी खरं सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही? खडसेंचा सवाल
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकमेकांची लायकी काढलीय. एकनाथ खडसे यांना लायकी नसताना पक्षानं पदं दिली, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. त्याला आता खडसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
जळगाव : राज्याचं राजकारणात जळगावातील (Jalgaon) दोन माजी मंत्र्यांचं वैर आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्वाश्रूमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकमेकांची लायकी काढलीय. एकनाथ खडसे यांना लायकी नसताना पक्षानं पदं दिली, असं वक्तव्य गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं. त्याला आता खडसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजनांनी आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, त्यांनी निधीसाठी माझे पाय धरले होते की नाही? असा सवाल आता खडसेंनी केलाय. त्याचबरोबर आपली लायकी आपणच ओळखायची असते, दुसऱ्यांनी सांगण्याची गरज लागू नये, असा खोचत टोलाही त्यांनी महाजनांना लगावलाय. त्यामुळे जळगावातील दोन दिग्गज नेत्यांमधील वाक् युद्ध आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनललंय.
‘महाजन यांना कुणी ओळखत नव्हतं, मी मोठं केलं’
गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केल्यानंतर आता खडसेंनीही महाजनांवर जोरदार हल्ला चढवलाय. गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं की निधीसाठी माझे पाय धरले होते की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते, दुसऱ्यांनी सांगायची नसते. माझ्या मागे लांगूलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला. महाजन यांना कुणी ओळखत नव्हतं मी मोठं केलं त्यांना. जामनेर मतदारसंघ शिवसेनेचा होता. मी स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रही केल्यानं जामनेर भाजपकडे आला. मग त्यांना जामनेरमधून भाजपचं तिकीट मिळालं, अशा शब्दात खडसेंनी महाजनांवर हल्ला चढवलाय.
‘फडणवीसांची हांजी हांजी करुन नेतृत्व मिळवलं’
खडसे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या, मला पैसे द्या अशी मदत मागायचा. आता जळगाव जिल्ह्यात सर्वत्र पराभव झाल्यानं महाजन विचलित झाले आहेत. मला कमकुवत करण्यासाठी भाजपकडून महाजनांचा बळ, नेतृत्व देण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांची हांजी हांजी करुन त्यांनी नेतृत्व मिळवलं, अशी तिखट टीकाही खडसेंनी महाजनांवर केलीय.
महाजन नेमकं काय म्हणाले?
लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पदं दिली. ग्रामपंचायतमध्ये पडले. नगरपालिकेत आमचा महापौर आहे. मुलगी विधानसभेला उभी राहिली आणि पडली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का? असा खोचक सवाल महाजनांनी केलाय. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांचं भाषण मी ऐकलं, म्हणाले दोन चार मानणांना जेलमध्ये टाका. एखादा विक्षिप्त माणूसच असं करू शकतो, अशी टीकाही महाजनांनी केलीय.
इतर बातम्या :