हा कसला सेनेचा आमदार, काय स्वत:ला शिवसैनिक म्हणवतो, लेकीवरील हल्ल्यानंतर खडसे आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला झाला होता.
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला झाला होता. रोहिणी खडसेंवरील हल्ल्या वरुन एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. दोन दिवसांपुर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
महिलांवर हल्ला करणारे कोण, विनयभंग करणारे कोण या गुंड प्रवृत्तीच्या लोक चौकशी झाली पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले. हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जागेचा त्याग केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि आता स्वत: ला शिवसैनिक म्हणून घेतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार
चंद्रकांत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळं आमदार झाले. आता त्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं.
संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना? रोहिणी खडसेंचा सवाल
रोहिणी खडसे यांनी देखील काल झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रोहिणी खडसे यांनी ट्विटवरुन प्रश्न विचारला आहे. संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना ?@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks@ChakankarSpeaks@supriya_sule@AUThackeray
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 28, 2021
पोलिसांनी तातडीनं तपास करावा, रुपाली चाकणकर
रोहिणी खडसे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला.एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
इतर बातम्या :
Eknath Khadse slam Chandrkant Patil after attack on Rohini Khadse car on 27 December