ऐन दिवाळीत एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; मंत्री गिरीश महाजन यांनी दिला झटका
खडसे यांचे कट्टर विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीच खडसे यांना झटका दिला आहे.
जळगाव : ऐन दिवाळीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. खडसे यांचे कट्टर विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीच खडसे यांना झटका दिला आहे. खडसे यांचे भोसरी प्रकरण पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी उचलून धरले आहे. भोसरी प्रकरणावर थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भोसरी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करा अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
महाजन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हा झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालंच पाहिजे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा असे गिरीश महाजन म्हणाले.
खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल. खडसे जर शुद्ध असतील तर सर्व गोष्टी बाहेर यायला हव्या असेही गिरीश महाजन म्हणाले.
भोसरी घोटाळा प्रकरणी खडसे यांना 2018 मध्ये ‘क्लीन चिट’ मिळाली
भोसरी भूखंडा प्रकरणी एकनाथ खडसे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुणे अँटी करप्शन विभागाच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे . या प्रकरणी एकाथ खडसेंची अनेकदा चौकशी झाली होती. भोसरी घोटाळा प्रकरणी खडसे यांना 2018 मध्ये ‘क्लीन चिट’ मिळाली होती. मात्र, राज्यात सत्तापालट होताच खडसेंच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा
2016 मध्ये फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. सामीजीक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला होता.