Shiv Sena : मोठी बातमी… आमदार, खासदारानंतर शिवसेनेत नगरसेवकांनाही बंडाची लागण, मुंबई, ठाण्यात 70 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेंसोबत?
शिवसेनेत मोडी बंडाळी माजल्याचं सिद्ध होतंय. कारण शिवसेना आमदारांसह, खासदार आणि आता मुंबई, ठाण्यातील तब्बल 70 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याशी सहमत असल्याची माहिती मिळतेय!
मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडानं राज्याच्या राजकारणात भूंकप उडालाय. मागील 72 तासांपासून राज्यात प्रचंड घडामोडी सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे (Shivsena) आणि शिवसेना समर्थक असे 35 आमदार सूरत मुक्कामी होते. त्यानंतर रात्रीतून त्यांना आसामला हलवण्यात आलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार ते सरकार बरखास्तीचा निर्णय घेणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अशास्थितीत शिवसेनेत मोडी बंडाळी माजल्याचं सिद्ध होतंय. कारण शिवसेना आमदारांसह, खासदार आणि आता मुंबई, ठाण्यातील तब्बल 70 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याशी सहमत असल्याची माहिती मिळतेय!
शिवसेना आमदारही म्हणतात भाजपसोबत चला!
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेतच आहोत. आमच्या आमदारांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. तसंच आम्ही पक्ष सोडलेला नाही असं स्पष्ट केलंय. त्याचवेळी आपल्यासोबत तब्बल 46 आमदार असल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे तीन खासदार अनुपस्थित असल्याची माहिती मिळतेय. त्यात भावना गवळी, प्रताप जाधव आणि राजेंद्र गावित यांचा समावेश आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी भावना या खासदारांचीही असल्याचं कळतंय.
ठाण्यातील 50, मुंबईतील 20 नगरसेवक शिंदेंच्या पाठीशी
त्याचवेळी मुंबई महापालिकेतील 20 तर ठाणे महापालिकेतील 50 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार नको. भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी या नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे आमदार, खासदार आणि आता शिवसेनेचे तब्बल 70 नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022