मुंबई : एकनाथ शिंदे सरकारचं पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकरी मदत आणि मागील सरकारच्या काळातील निर्णयांना दिलेली स्थगिती या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे यांनीही तितक्याच आक्रमकपणे आणि खोचकपणे प्रत्युत्तर दिलंय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजितदादांवर पलटवार केलाय.
शेवटी लोकशाहीत तत्व असतात, भूमिका असते, विचार असतो. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचं, आमच्या आमदारांचं, खासदारांचं जे स्वागत होत आहे ते झालं असतं का? सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, असा टोलाही शिंदे यांनी लगावलाय. तसंच सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे म्हणाले.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर शिंदे आणि फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही. हा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. म्हणजे निसर्गानेही आमच्या सरकारला साथ दिलीय. विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे आपल्या पत्रकार परिषदेत मांडले. आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे. मला वाटलं हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे की काय. अजितदादांनी म्हटलं की आम्ही 750 निर्णय घेतले. धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले की एकनाथ कुठेय? मी माझ्या जागेवरच आहे. निर्णय घ्यायला खंबीरपणे उभं राहावं लागतं. त्यात शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानाचा निर्णय असेल.
अतिवृष्टीबाबतही अजिदादांनी प्रश्न उपस्थित केले. मी आणि फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. विरोधी पक्षनेतेही गेले पण ते पूर ओसरल्यावर गेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी गेले नाहीत हा त्यांचा मुद्दा होता. पण आम्ही ग्राऊंडवर काम करणारे लोक आहोत. आधीच्या काळात एनडीआरएफट्या निकषाप्रमाणे 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर मदत दिली होती. त्यानंतर जून, जुलैमध्ये 10 हजार प्रति हेक्टर दिले होते. आता आमच्या सरकारने 13 हजार 600 प्रति हेक्टर मदत करण्याचा निर्णय घेतलाय. बागायती पिकं होती त्याला 17 हजार प्रति हेक्टरचा निर्णय होता. आपण 27 हजार प्रति हेक्टर मदत जाहीर केलीय. बहुवार्षिक जी पिकं असतात त्याला 25 हजार प्रति हेक्टरी होते. ती आपण 37 हजार प्रति हेक्टर केलीय. तसंच आपण दोन हेक्टरची मर्यादा आणि तीन हेक्टरवर नेली आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त मदत आपण करत आहोत, असा दावा शिंदे यांनी केला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू, असंही शिंदे म्हणाले.
स्थगितीबाबत कुठलीही अत्यावश्यक कामं आम्ही रद्द केली नाहीत. त्यांनी सरकार अल्पमतात आल्यानंतर घाईगडबडीत निर्णय घेतले, शेवटच्या दोन कॅबिनेटमध्ये तिनशे, चारशे जीआर काढले. गरज एक रुपयाची आणि निधी 10 रुपये असा निर्णय आपल्याला घेता येणार नाहीत. मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा दिल्यानंतर काही निर्णय घेतले गेले आहेत. त्याकडे आम्ही पाहायचं नाही का? आम्ही आढावा घेऊन आवश्यक आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. आकसापोटी आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. त्यामुळे अत्यावश्यक कामं, आमदारांची कामं, औषध खरेदीला स्थगिती नाही, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.
Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!