Eknath Shinde : ‘संजय राऊत तुम्ही आमच्यामुळे राज्यसभेवर, राजीनामा द्या आणि विजयी होऊन दाखवा’, राऊतांनी बाप काढल्यानंतर केसरकरांचं थेट आव्हान
शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसंच त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असं थेट आव्हानच दिलं आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बंडखोर आमदारांवर तिकट शब्दात टीका केली जातेय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर बंडखोर आमदारांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘जे इथे राहिले ते एका बापाचे आणि तिकडे गेले ते 10 बापाचे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी जाहीर व्यासपीठावरुन केलंय. राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदे गटातील आमदारही आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसंच त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असं थेट आव्हानच दिलं आहे.
शिवरायांचं नाव घेऊन चालण्याऱ्या शिवसेनेला असा प्रवक्ता चालतो का?
संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, ‘आम्ही एका बापाचे आणि जे गेले ते 10 बापाचे असं त्यांचं वक्तव्य होतं. आम्ही ते उच्चारूही नये एवढं ते घाणेरडं वाक्य आहे. एखाद्या व्यक्तीला अनेक बाप याचा अर्थ काय होतो. या महाराष्ट्राने महिलांचे नेहमी इज्जत केली, सन्मान केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनीही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईची उपमा दिली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नावं घेऊन चालणाऱ्या शिवसेनेला असा प्रवक्ता चालतो का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय.
उद्धव ठाकरेंना आवाहन
इतकंच नाही तर ‘यांना आम्हीच मतं दिली म्हणून ते राज्यसभेवर गेले आहेत. आधी त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावं. एखाद्याच्या कुटुंबाविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? शिवसेनेच्या नावासह आमचंही काही काम आहे मतदारसंघात. कोकणात बाळासाहेबांना विजय हवा होता त्या विजयात माझंही काम आहेच. आणि आम्ही राऊतांकडून असं ऐकून घेऊन काय? कशा पद्धतीची वक्तव्ये त्यांची सुरु आहेत. ते बोललात आम्ही त्यांच पोस्टमार्टेम करु… मुख्यमंत्री महोदय केवळ शिवसेना पक्षप्रमुख नाहीत, ते घटनात्मक पदावर आहेत. इथं तुम्ही म्हणता लोकांनी रस्त्यावर उतरावं. हेच वक्तव्य दुसरं कुणी केलं असतं तर तो आतापर्यंत जेलमध्ये असता, ही वस्तुस्थिती आहे कारण मी गृहखात्याचा मंत्री होतो. काय सुरु आहेत महाराष्ट्रात? नंतर आपण म्हणायचं केंद्रानं हस्तक्षेप केला. तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा या राज्याची जबाबदारी तुमच्यावर असते. तुम्ही शपथ घेतलेली असते की कुणाविरोधातही द्वेष भावना बाळगणार नाही. करा ना तसा कारभार. आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे तुम्ही कोरोनाकाळात चांगलं काम केलं’, असंही केसरकर म्हणाले.
राष्ट्रवादीच्या आमदारांवर आरोप केला, मग पुढे काय?
‘अशा वक्तव्यांमुळे अनेक लोक दुखावले गेले आहेत. यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने आम्हाला जे मतदार दिले होते त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, असं हेच राऊत म्हणाले होते. मग त्यांच्याविरोधात काय केलं? काहीच केलं नाही म्हणून आमची संतप्त झालो. त्यांची लोकं येतात आमच्या मतदारसंघात आणि त्यांचा उमेदवार जाहीर करतात मग शिवसेना शिल्लक कशी राहणार? आम्हाला जे करायचं ते आम्ही करु आमच्यात हिंमत आहे, म्हणून आम्ही इकडे आलो’, अशा शब्दात शिंदे गटाकडून राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलंय.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी
काल अनावधानाने का होईना आदित्य ठाकरेंकडून एक वक्तव्य केलं गेलं, पक्षातील घाण गेली म्हणून, ही तुम्हाला आज घाण वाटते का? संजय राठोड कुटुंबातील एका लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत जेलमध्ये होते. त्या गुलाबराव पाटलांवर 17 – 17 केसेस होत्या. त्या दादा भुसेंनी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यांना तुम्ही घाण म्हणणार? कालपर्यंत यांनाच तुम्ही गाडीत घेऊन जात होता. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा माझ्यासारखा आमदार आहे, त्याला तुम्ही घाण म्हणणार?, असा प्रश्न केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना विचारलाय.
‘हिंमत असेल तर पुन्हा निवडून दाखवा’
केसरकर पुढे म्हणाले की, त्या राऊतांनी आम्हाला वाटेल तसं बोलायचं, हे कुठपर्यंत सहन करणार? एका मर्यादेपर्यंत सहन करणं ठीक आहे. पण ज्यावेळी तुमच्या कुटुंबावर, तुमच्या आईवर, वडिलांवर येतात तेव्हा आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्यांना असं उत्तर देऊ की त्यांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. आमच्या मतांवर निवडून आले ना, मी त्यांना जाहीर आव्हान देतो, सोडा ती खुर्ची, पुन्हा निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा, असं थेट आव्हानच केसरकर अर्थात शिंदे गटाकडून संजय राऊतांना देण्यात आलंय.