मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेना दुभंगली आहे. अशावेळी शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आज शिवेसना भवनात पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहा महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकीतून बंडखोर आमदारांना कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात केसरकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर आम्ही कुणीही उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत सरकार बनवा. आपण भाजपसोबत युती म्हणूनच निवडणूक लढवली तर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यात काय अडचण आहे? असा सवाल शिंदे गटाकडून करण्यात आलाय. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पण विषय दुसराच निघतो. आम्ही विनंती काय केली की शिवसेना-भाजपनं एकत्र यावं, ते काय म्हणतात की मी राजीनामा देतो. पण राजीनामा कुणी मागितलाच नाही. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरु आहे, असं होऊ नये. शेवटी ते नेते आहेत. त्यांनी बाळासाहेबांनंतर पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे, असंही दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितलं.
आम्ही शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. ज्या राष्ट्रवादीने आमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या खासदारांनाही त्रास दिला गेला. अशास्थितीत शिवसेनेचं अस्तित्व टिकावं यासाठी हा निर्णय घेतलाय. आज राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचं बहुमत संपलेलं आहे. त्यामुळे त्या अशा युक्त्या वापरू शकतील. जे काही कुणाशी बोलायचं असेल त्याचे अधिकार शिंदे साहेबांना दिले आहेत. शिंदे साहेब आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेतच. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा तो ते घेतील. पण कुठल्याही स्थितीत आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय.