मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आलेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाकडून त्यांचं नेतेपद काढलं जातं का, याबाबत चर्चा होती. शिंदेंना गटनेतेपदावरुन देखील हटवण्यात आल्याची कार्यवाही सुरु आहे. यातच आता आज एकनाथ शिंदेंना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय शिंदे संदर्भात निर्णय घेणार आहेत. आज दुपारी 1 वाजता शिवसेना (Shivsena) भवनात राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे. पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता.
शिवसेनेकडून सातत्यानं बंडखोर आमदारांच्या अडचणी वाढवल्या जातायत. यावर बोलताना शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की, ‘आत्ता कायद्याच्या कचाट्यात ते सापडले आहेत. त्यामुळे त्यांना आता कमळाबाईची साथ धरावी लागणार आहे. कायदा सांगतो आत्ता त्यांना विलीनीकरण करावं लागले. आत्ता त्यांना कळून चुकेल. आम्ही पत्र दिलं होतं. त्याच पत्राला अनुसरून काही उत्तरं आली त्यालाही आम्ही पत्र दिलं होतं. त्यांनी दिलेलं पत्रही खोट आहे. त्यांच्या कुणाच्या मेलवरून पत्र आलं नाही. त्यामुळे आत्ता आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात त्यांच्यावर कारवाई होईलच, अशी पाऊलं विधानसभा अध्यक्ष आता उचलत आहेत, असा कडकडीत इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणार्या आमदारांवर आवश्यक त्या कारवाई करण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, पक्षांतर केल्यामुळे अपात्र ठरणार्या तसेच राजीनामा देणार्या आमदारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी (Ban) घालण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या महिला नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने 29 जूनला सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.