ब्रेकिंग! शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं? गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद?
आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड!
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या माहितीनुसार फक्त दोन मंत्रिपदेच नाही, तर दोन राज्यपाल (Maharashtra Politics) पदांची मागणीदेखील शिंदे गटाकडून केली गेलीय. अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मागणी केल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे अमित शाह मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागणीवर आजच अंतिम निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं जातंय. याशिवाय नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जातेय.
पाहा व्हिडीओ :
यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, की अमित शाह आणि नरेंद्र मोदी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आता ता भक्कम पाठिंबा 2 केंद्रीय मंत्रिपदासह 2 राज्यपाल पद देण्याइतका मजबूत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. या दोघांच्या नावाची गेल्या दोन दिवसांपासून चर्चाही बघायला मिळाली होती. मात्र या दोघांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताना आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हटलं होतं. आधी ठाकरे गटात असलेल्या गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानं चर्चांनाही उधाण आलेलं. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या इच्छेपोटीच कीर्तिकर शिंदे गटात गेले नाहीत ना?, असा सवालही उपस्थित केला जात होता.
दरम्यान, अमित शाह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकही पार पडली होती. आता समोर आलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील चर्चेवरुनही तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे आज मुंबईत शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलंय.