Eknath Shide vs Uddhav Thackeray : बुद्धीबळ खेळणारे शिंदे आणि पवार, पण सत्तेच्या सारीपाटावर कुणाचा डाव यशस्वी होणार? की फडणवीसच बाजी मारणार?
Uddhav Thackeray Maharashtra Politics राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटक पक्षांमुळे आपलं खच्चीकरण झालं, असा आरोपही करण्यात आला. पण या सनसनाटी आरोपांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे
मुंबई : महाराष्ट्रात राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनं खळबळ उडवून दिली. महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) ढवळून निघालं. आता पुढे नेमकं काय होणार? याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही, तर देशाच्या राजकारणं लक्ष लागलंय. अशातच दोन महत्त्वाची दृश्य समोर आली आहेत. एक आहे एकनाथ शिंदे यांचा बुद्धीबळ खेळताचा फोटो तर, दुसरं दृश्य आहे शरद पवार यांचा बुद्धीबळ खेळतानाचा व्हिडीओ. सध्या राजकीय घडामोडींवर या दोन्हींची तुफान चर्चा होतेय. हे व्हिडीओ आणि फोटो एकमेकांना सोशल मीडियावर (Social Media) प्रत्युत्तर देण्यासाठी वापरले जात आहेत. या सगळ्या राजकीय भूकंपात सत्तेच्या सारीपाटावर बाजी कोण मारणार? याची चर्चा रंगली आहे. यावरुन पैजा लागल्यात.
पाहा शरद पवारांचा व्हिडीओ :
एकनाथ शिंदे हे सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांची संख्या वाढत असल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. अशातच आपणच गटनेते असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे करुन झालेत. आता ते शिवसेनेवरच दावा ठोकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी घेतली आहे. ट्वीटर, फेसबुक यावरुन सध्या एकमेकांना प्रत्युत्तरं दिली जात आहेत. 24 तासांत परत या, तुमच्या मागणीचा विचार करु, असा अल्टिमेटम संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना दिलाय. त्यानंतर थेट राऊतांनाही सुनावण्यात आलं होतं. शिवाय शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सर्व आमदारांची नाराजी कोणत्या टोकापर्यंत गेली आहे, हे सांगणारा व्हिडीओही पोस्ट केला.
पाहा :
दरम्यान, शिंदे गटातील शिवसेना आमदार महाविकास आघाडीत राहण्यास इच्छुक नाही, हे तर उघड झालंच आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटक पक्षांमुळे आपलं खच्चीकरण झालं, असा आरोपही करण्यात आला. पण या सनसनाटी आरोपांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांच्या पत्रकार परिषदेआधी अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निधी वाटपात अन्याय करण्यात आला नाही, असंही स्पष्ट केलंय.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमोर सरकार वाचवण्याचं आव्हान आहे. पण या सगळ्यात गेल्या दिवसांपासून भाजपचे नेते सावध भूमिका घेताना दिसत आहेत. वेट एन्ड वॉच अशी भूमिका भाजपने घेतल्याचं दिसून आलंय. तिकडे दिल्लीत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी चर्चा झाली. तब्बल अडीच तास झालेल्या या चर्चेत महाराष्ट्राच्या राजकारण्याच्या दृष्टीने काय रणनिती ठरली, यावरुही तर्कवितर्कांना उधाण आलंय.
सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपातून कोण कुणाला सावरतं? बुद्धीबळ खेळणारे शिंदे आणि पवार सध्या तरी दिसत असले तरी सत्तेच्या सारीपाटावर कुणाचा डाव यशस्वी होणार? की सारीपाट मांडणारे फडणवीसच बाजी मारणार? याचं गूढ वाढत चाललंय.