Sudhir Mungantiwar : …म्हणून शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच हक्क; मुनगंटीवारांनी सांगितलं नेमकं कारण
एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर खरा हक्क असल्याचे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : आज शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, मात्र मला वाटतं एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर हक्क आहे. कारण त्यांच्याकडे 40 आमदार असल्याची प्रतिक्रिया भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, मात्र मी म्हणतो शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच पूर्ण अधिकार आहे. कारण त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्षाचे तसे नसते पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना टोला
पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहातो, त्यामुळे पक्षावर पहिला हक्क हा कार्यकर्त्यांचा असतो. 40 आमदारांनी हिंदूत्त्वाचा विचार केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मिळवलेल्या सत्तेला लाथ मारली मात्र अजूनही काही लोक खुर्चीच्या प्रेमात आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे.
अमित शहांवरील टीकेला प्रत्युत्तर
यावेळी अमित शहांवर करण्यात आलेल्या टीकेला देखील मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. वरून किर्तन खालून तमाशा हे वक्तव्य अमित शहा यांच्यासाठी नाही तर उद्धव ठाकरेंसाठी लागू होत असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विजयादशमी हा आनंद वाटण्याचा दिवस आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वाद नको म्हणून मैदान यांनाही नको आणि त्यानांही नको, यातून कदाचीत हा वाद निकाली निघू शकतो. मात्र याबाबत मनापाने निर्णय घ्यायचा आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.