मुंबईत मनसेच्या एन्ट्रीने देवरा सुखावले, तर सावंत दुखावले
मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपआपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याठिकाणी मनसे खुलेआमपणे काँग्रेसच्या बाजूने निवडणूक प्रचारात उतरली आहे. त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. मनसे यंदा लोकसभा […]
मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपआपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याठिकाणी मनसे खुलेआमपणे काँग्रेसच्या बाजूने निवडणूक प्रचारात उतरली आहे. त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
मनसे यंदा लोकसभा निवडणूक लढवत नसली, तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोदी-शाह यांचा पराभव करण्यासाठी राज्यभर सभा घेत आहेत. दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईत मनसेचे कार्यकर्ते हिरीरीने मिलिंद देवरा यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे देवरा सुखावल्याचे, तर सावंत दुखावल्याचे चित्र आहे.
मनसेचे दक्षिण मुंबईचे पदाधिकारी बबन महाडिक याबाबत म्हणाले, ‘मोदी-शाह यांचा पराभव करायचा आहे. म्हणून आम्ही पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार मिलिंद देवरा यांचा प्रचार करत आहोत.’
तर मिलिंद देवरा मनसेच्या सहभागाविषयी म्हणाले, ‘मला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. शिवसेनेने आधी टीका केली, मात्र नंतर आता ते भाजपबरोबर आहेत. ते संधीचे राजकारण करतात. राज ठाकरे किमान संधिसाधू तरी नाहीत.’
‘मागील निवडणुकीत मोदींच्या लाटेत अरविंद सावंत विजयी’
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत अरविंद सावंत विजयी झाले होते, असा प्रचार होतो आहे. त्यामुळे यंदा स्वकर्तृत्वावर जिंकून येत आपल्या राजकीय विरोधकांना उत्तर देण्याचे आव्हान सावंत यांच्यापुढे आहे. प्रचाराच्या निमित्ताने सावंत आणि देवरा यांच्यात कामगिरीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अरविंद सावंत यांनी गेल्या 5 वर्षात सर्वसामान्यांचे नेमके कोणते प्रश्न सोडवले. खासदार गेले 5 वर्षे कोठे होते? असा सवाल मिलिंद देवरा यांनी केला आहे.
स्वतःला घरात कोंडून घेणाऱ्यांना कामं कशी दिसणार?
देवरा यांच्या आरोपांवर उत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, ‘माझ्यावर आरोप करणारी मंडळी गेली 5 वर्षे कुठे होती. त्यांचे आरोप हास्यास्पद आहेत. स्वतःला घरात कोंडून घेतल्यानंतर स्वतःच्या घराची खिडकीही त्यांनी उघडली नाही. त्यामुळे सूर्यकिरणेही आत आली नाहीत, तर मग त्यांना माझी कामे कशी दिसणार?’ सावंत यांनी यावेळी मनसेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘लोकसभा, विधानसभेत मिळालेली मते महापालिका निवडणुकीत कोठे गेली? मला वाटते त्यांच्या नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली आहे. मराठी माणूस मलाच मतदान करेल.’
काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या खासदारांनी या मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे. मतदारांनी प्रत्येक पक्षाला येथे आजमावले आहे. मात्र, यंदा कुणाला संधी मिळणार हे येणारा काळच सांगेल.