मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षचिन्हाचा वाद निकाली काढला आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. शिंदे गटाच्या बाजूने हा निकाल आला. ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या निकालावरप्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, संसदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण या दोन अत्यंत महत्त्वाच्या आधारशिला असतात. भारतीय जनता पक्षाच्या दंडेलशाहीच्या कारकिर्दीमध्ये वरील दोन्ही तत्वांना हरताळ फासण्याचं आणि या आधारशिला खिळखिळ्या करण्याचं काम सातत्याने चालत आहे.
निवडणूक आयोगानं आज दिलेला निकाल बघण्याच्या आधी मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे या तिघांचे स्टेटमेंट काय पद्धतीचे आहेत, हे तपासून बघीतले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. हे नेते धनुष्यबाण आम्हालाचं मिळणार. निकाल आमच्याच बाजूने लागणार. तुम्ही कोऱ्या स्टँप पेपरवर लिहून घ्या अशा वल्गना करतात.
याचा अर्थ स्वायत्त यंत्रणांमध्ये काय पद्धतीने हस्तक्षेप होत असेल,हे चित्र स्पष्ट आहे. पण, निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. त्यातही प्रतिकांच्या राजकारणापेक्षा मूल्याधिष्ठित राजकारणात शिवसेनेचे अधिष्ठान सेना भवन, मातोश्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं.
निवडणूक आयोगानं निकाल दिला असला तरी उद्धव ठाकरे या निकालाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. न्यायाधीश नेमताना प्रक्रिया असते तशी आयुक्त नेमताना असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आजचा निर्णय हा अनपेक्षित असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगाबद्दल शंका व्यक्त केली होती. २४ तासांत ही फाईल हलली कशी. त्यांची नेमणूक झाली कशी. न्यायाधीश नेमणूक करण्याची पद्धती असते तशी प्रक्रिया निवडणूक आयुक्त नेमताना केली गेली पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं.