कोल्हापुरात नवा पक्ष, ‘आमचं ठरलंय’ला मान्यता देण्याचं निवडणूक आयोगानेही ठरवलं

| Updated on: Aug 27, 2020 | 9:10 AM

प्रमोद पाटील हे 'आमचं ठरलंय विकास आघाडी'चे प्रमुख आहेत. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत.

कोल्हापुरात नवा पक्ष, आमचं ठरलंयला मान्यता देण्याचं निवडणूक आयोगानेही ठरवलं
Follow us on

कोल्हापूर :आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ दिग्गज पक्षांना भिडण्याची शक्यता आहे. (Election Commission grants permission to Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)

‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवता येणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी करुन घेतली आहे.

प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख आहेत. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते.

कोल्हापुरात काय चित्र?

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.

तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक मात्र एकमेकांविरोधात स्वबळावर लढण्याचीच चिन्हे आहेत. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे

कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस- 30
राष्ट्रवादी- 15
शिवसेना- 04

ताराराणी आघाडी- 19
भाजप- 13

काय आहे ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. “आमचं ठरलंय” असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्याचा फटका महाडिक यांना बसला आणि त्यांना तब्बल दोन लाख 75 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर विधानसभेला याचा दुसरा अंक पाहायला मिळाला.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थिती लावली होती. याच मेळाव्यात सतेज पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीला खासदार मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा तर दिलाच, पण त्याआधी ऋतुराज पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रणही दिलं होतं.

संबंधित बातम्या

कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ची जुळवाजुळव

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर 

 ‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने  

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी 

(Election Commission grants permission to Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)