मोदींच्या क्लीन चीटवरुनही मतभेद, निवडणूक आयुक्त अशोक लवासा नाराज
नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीला हजेरी लावण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेल्या क्लीन चीट प्रकरणी अशोक लवासा नाराज आहेत. आपलं मत विचारात न घेतल्याने लवासा यांनी बैठकीला न जाणं पसंत केल्याचं सांगण्यात येत आहे. लवासा म्हणाले, “बैठकीला जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यादरम्यान मी दुसऱ्या कामात […]
नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीला हजेरी लावण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेल्या क्लीन चीट प्रकरणी अशोक लवासा नाराज आहेत. आपलं मत विचारात न घेतल्याने लवासा यांनी बैठकीला न जाणं पसंत केल्याचं सांगण्यात येत आहे. लवासा म्हणाले, “बैठकीला जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यादरम्यान मी दुसऱ्या कामात तरी लक्ष देऊ शकेन”
पंतप्रधान मोदींना क्लीन चीट देताना आपलं मत विचारात घेतलं नसल्याचा आरोप अशोक लवासा यांचा आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना 8 प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) तीन सदस्यीय समितीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि दोन निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश आहे.
अशोक लवासा यांनी 4 मे रोजी पत्र लिहून याबाबत खुलासा केला होता. “जेव्हापासून माझं अल्पमत विचारात घेतलं नाही, तेव्हापासून मला आयोगाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यासाठी दबाव आणण्यात आला. माझं मत विचारात घेतलं नाही तेव्हापासून निवडणूक आयोगातील निर्णय प्रक्रियेत माझा काहीही संबंध नाही”, असं लवासा यांनी मुख्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं.
याशिवाय याप्रकरणी दुसऱ्या कायदेशीर प्रक्रियेचाही विचार करु. मी नेहमीच पारदर्शी कारभाराच्या बाजूने आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र मिळाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी अशोक लवासा यांच्यासोबत बैठक बोलावली होती.
पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये 21 मे रोजी दिलेल्या भाषणाप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या क्लीन चीटवर अशोक लवासा नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.