गोंधळात गोंधळ! चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं डिलीट!
शिमला : हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 20 अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रविवारी 19 मे रोजी हा प्रकार घडला. याबाबत हिमाचलचे […]
शिमला : हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 20 अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रविवारी 19 मे रोजी हा प्रकार घडला.
याबाबत हिमाचलचे मुख्य निवडणूक आयुक्त देवेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पाच पिठासीन अधिकारी आणि 15 निवडणूक अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष मतदानाच्या तासाभरापूर्वी ईव्हीएम सुरळीत आहेत का, जे बटण दाबलं जातं त्याच उमेदवाराला मत जातं का, काही तांत्रिक बिघाड तर नाही ना, हे तपासण्यासाठी चाचणी मतदान घेतलं जातं. जवळपास 50 मतं ईव्हीएमवर करुन पाहिली जातात. यावेळी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधीही हजर असतात. मतदान योग्य होत असल्याची खात्री पटल्यानंतर चाचणीसाठी घेतलेली मतं ईव्हीएमवरुन डिलीट केली जातात.
देशभरात कोणत्याही मतदानापूर्वी असेच मॉक पोलिंग केलं जातं. हिमाचल प्रदेशातही ही प्रक्रिया केली, मात्र चाचणीसाठी घेतलेली मतं डिलीट करण्यास अधिकारी विसरले आणि हा सर्व गोंधळात गोंधळ झाला.
याबाबत देवेश कुमार म्हणाले, “हिमाचलमध्ये शेवटच्या टप्प्यात रविवारी मतदान झालं. यावेळी चाचणीसाठी घेतलेली मतं डिलीट करण्यास 20 अधिकारी विसरले. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात ही मतं जमा झाली. ही चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष झालेल्या मतदानातील मतं डिलीट करुन आकड्याचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला”
हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, हमीरपूर आणि कांग्रा या लोकसभा मतदारसंघात 19 मे रोजी मतदान झालं. त्यादरम्यान हा प्रकार घडला.