एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या शिवसेना प्रवेशापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा नारळ

| Updated on: Aug 23, 2019 | 7:53 AM

नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे निश्चित आहे, मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या शिवसेना प्रवेशापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा नारळ
Follow us on

विरार : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशाच्या चर्चा जोरावर आहेत, मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांचा उतावीळपणा पाहायला मिळत आहे. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात (Nalasopara) प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला.

नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र अद्याप त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला नाही. परंतु नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव यांची तयारी सध्या जोरात सुरु आहे. या ठिकाणी भावी आमदार प्रदीप शर्मा असे बॅनर लागले आहेत. तसेच शर्मा यांचे फोटो असलेल्या 20 हजारांहून अधिक टीशर्ट्सचंही वाटप करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे कोकणवासियांना गणपती दर्शनासाठी 100 रुपयात बसेस करुन देण्यात येत आहेत. त्यावरही प्रदीप शर्मा यांना सौजन्य देण्यात आलं आहे. त्यामुळे शर्मांच्या पक्षप्रवेशापूर्वीच प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे.

एकीकडे, शिवसेना आणि भाजप ‘आमचं ठरलंय’ सांगत विधानसभा निवडणुकीला युतीत सामोरं जाणार असल्याचं सांगत आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु असल्यामुळे ‘नेमकं काय ठरलं आहे’ असा प्रश्नही मतदारांना पडला आहे.

प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. निवृत्तीपूर्वीच 4 जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज केला होता. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिलं होतं. त्यामुळे प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची अटकळ बांधली जात होती.

सुरुवातीला प्रदीप शर्मा यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र अचानक शर्मा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना तोंड फुटलं. प्रदीप शर्मांसाठी अंधेरी, चांदिवली किंवा नालासोपारा या तीन मतदारसंघांची चाचपणी केली जात होती, असं बोललं जातं.

कोण आहेत प्रदीप शर्मा ? 

प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. गेल्या अनेक ते वर्षापासून मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर ते काम करत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल 113 गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नोंद त्यांच्या नावे आहे.